गंभीर गुन्हे दाखल झाल्याने लागला ‘मोक्का’; परभणीतील फरार आरोपी शिक्रापुरात जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची शिक्रापुरात कारवाई

    शिक्रापूर : परभणी जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने परभणी पोलिसांकडून मनोज भगवान पंडित याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. असे असताना मनोज पंडित फरार झाला असल्याने या आरोपीला पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.

    परभणी येथील एका व्यक्तीची दहा एकर जमीन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने कब्जा घेऊन जमीन नावावर करण्यासाठी मनोज पंडित याने जमीन मालक व्यक्तीला ऑडिओ क्लिप प्रसारित करून बदनामी करू, महिला विनयभंग, बलात्कार खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी पोलिसांनी या टोळीवर कडक कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये, मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

    आरोपी मनोज पंडित हा फरार झालेला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो वारंवार पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, या गुन्ह्यातील आरोपी हा परभणी येथून फरार होऊन पुणे जिल्ह्यात शिक्रापूर परिसरात आला असून, तो राहण्यासाठी खोली शोधत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली.

    त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे, पोलीस हवालदार जनार्धन शेळके, राजु मोमीन, अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस शिपाई अक्षय जावळे, दगडू वीरकर यांनी शिक्रापूर परिसरात सापळा लावत मनोज भगवान पंडित (वय २४ वर्षे, रा. वांगी रोड परभणी जि. परभणी) याला जेरबंद केले असून, त्याला परभणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.