सीरम दुर्घटना : आवरायला सुरुवात कर तोपर्यंत मी येतो, अन तो परत आलाच नाही… 

घटनेच्या संध्याकाळी पहिल्यांदा प्रतीकचा अपघात झालाय असं त्याच्या कुटुंबाला सांगण्यात आलं. नंतर त्याचा सीरमला लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याचं समोर आलं. रात्री उशीरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आगीत त्याचं शरीर भाजल्याने त्याच्या आईला त्याला शेवटचं पाहता देखील आलं नाही.

पुणे: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत प्रतीक पाष्टे याचा होरपळून मृत्यू झाला. एका कंपनीतर्फे तो सीरममध्ये बॅटरी बसवण्यासाठी गेला होता. अचानक लागलेल्या आगीमुळे त्याला बाहेर पडता आले नाही अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र रुग्णालयात दाखल असलेल्या प्रतीकांच्या वडिलांना अद्याप त्यांच्या मृत्यूची माहिती दिली नसल्याचे प्रतीकच्या आईने सांगितले आहे.

प्रतीकचं कुटुंब पुण्यातील प्रभात रोडवरील एका गल्लीमध्ये छोट्याश्या घरात राहतं. त्याला एक लहान भाऊ आहे. प्रतीकचे आई-वडील घराच्या मागेच असलेल्या कॅनल रोडला चहाचा छोटासा स्टॉल चालवतात. दोनच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांना तब्येतीच्या काही समस्या जाणवू लागल्याने एका रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रतीकच्या निधनाची बातमी अद्याप त्यांना सांगितलीच नाहीय.

”त्याने सकाळी मला चहाचा स्टॉल लावून दिला तेव्हा त्याला फोन आला होता. त्याला सीरमला कामासाठी जायचं होतं. मला म्हणाला मी तिकडे जाऊन येतो. तू संध्याकाळी स्टॉल आवरायला सुरुवात कर तोपर्यंत मी येतो. अन तो परत आलाच नाही. त्याचे वडील आजारी होते, त्यामुळे त्यांना दोनच दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल केलंय. त्यांना अजून प्रतीक गेल्याचं माहित नाहीय. त्यांना हे सांगण्याच्या परिस्थितीत ते सध्या नाहीत.”