तीन सराईत वाहन चोरांकडून अडीच लाख रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त

वाकड पोलिस ठाण्यातील तपासी पथक वाहन चोरांचा शोध घेत असताना बापुसाहेब धुमाळ आणि प्रशांत गिलबिले यांना दोन वाहन चोर थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल जवळ थांबले असल्याची माहिती मिळाली.

    पिंपरी: वाकड पोलिसांनी तीन सराईत वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. वाकड पोलिसांनी दुचाकीचे ५ आणि जबरी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलजवळ करण्यात आली. शुभम जयभारत कांबळे (वय-२१ रा. भक्ती शक्ती चौक, ओटा स्कीम, निगडी), मनोज वसंत जाधव (वय-२१ रा. पत्रा शेड, ओटा स्कीम, निगडी), प्रविण प्रताप सोनवणे (वय-३६ रा. काळेवाडी, मुळ रा. खेडी बोकरी, ता. चोपडा, जि. जळगवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    वाकड पोलिस ठाण्यातील तपासी पथक वाहन चोरांचा शोध घेत असताना बापुसाहेब धुमाळ आणि प्रशांत गिलबिले यांना दोन वाहन चोर थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल जवळ थांबले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभम कांबळे आणि मनोज जाधव यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी प्रविण सोनवणे याच्या मदतीने वाहन चोरी आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

    वाकड पोलिसांनी प्रविण सोनवणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातून वाहन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच देहूरोड परिसरातून एक मोबाइल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ५० हजार९९९ रुपये किमतीच्या ७ दुचाकी आणि एक मोबाईल जप्त केला आहे. जप्त केलेल्या दुचाकीपैकी ५ दुचाकीचे आणि मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

    ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे १) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे २) सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, बापूसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, जावेद पठाण, नितीन ढोरजे, वंदु गिरी, प्रशांत गिलबीले, आतिश जाधव, नितीन गेंगजे, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, तात्या शिंदे यांच्या पथकाने केली.