जुन्नर तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी

दिनेश दुबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

जुन्नर : जुन्नर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असुन, राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय ५८) यांना कोरोनाची लागण होऊन, उपचारादरम्यान पुणे येथे रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला

पुणे जिल्ह्यात करोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पुण्यातील अनेक लोकप्रतिनिधींना करोनाचा संसर्ग झाला आहे. जुन्नरमधील राष्ट्रवादी काँग्रसचे नगरसेवक दिनेश दुबे यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. रविवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुबे यांच्या जाण्यानं जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. दुबे यांनी जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्षही भूषावलं होतं. सध्या ते विद्यमान नगरसेवक होते शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते. रविवारी पहाटे दुबे यांचा करोनामुळे पुण्यातील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकळी त्यांची प्राणज्योत मालवली.