शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर आणि मी का नाही? : खासदार संभाजीराजे

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत का? असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.

    पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराज एकत्र होते तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत का? असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. दरम्यान यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, या विषयावर दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदारांना आमंत्रित करणार आहोत, असं ते म्हणाले.

    प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?

    दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर हा शिळेपणा दूर होईल, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणासाठी परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. पण आम्ही प्रयत्न करणार आहोत.

    राज्यसत्तेच्या माध्यमातून कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो

    पहिली घटना दुरुस्ती झाली ती आरक्षणाच्या मुद्द्यावरुनच झाली. ही घटनादुरुस्ती बाबासाहेबांनी केली त्यावेळचं भाषण महत्त्वाचं होतं. येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा हा त्रासदायक ठरणार आहे, हा मुद्दा इतकं डोकं वर काढेल की राज्यसत्ता चालवायलाच कठीण होईल, अशी परिस्थिती आहे, असंही आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणासाठी रिव्हू पिटीशन नाही, तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांमार्फत रिव्ह्यू करता येईल. म्हणूनच राज्यसत्तेची गरज आहे. राज्यसत्ता असेल तर आपण राज्यपालांमार्फत रिव्हू मागू शकतो आणि कोर्टाच्या अडचणीवर मात करु शकतो. हा एक मार्ग मला दिसत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय.