अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून होतोय ईडीचा गैरवापर, शरद पवारांनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्रातच(Maharashtra) नाही तर इतर राज्यातही ईडीचा गैरवापर(Misuse Of Ed) केला जात आहे. विरोधकांना नमवण्याचा केंद्राकडून प्रयत्न होत असल्याचे शरद पवारांनी(Sharad Pawar) सांगितले.

    पुणे: ईडीकडून (Action By Ed)होत असलेल्या कारवायांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही ईडीचा गैरवापर केला जात आहे. विरोधकांना नमवण्याचा केंद्राकडून प्रयत्न होत असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

    या यंत्रणांचा आतापर्यंत या देशात असा कधी वापर झाला नव्हता. मात्र हल्लीच्या सरकारने ही यंत्रणा विरोधकांना नमवण्यासाठी वापरायला सुरुवात केली आहे. हा गैरवापर महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही तर हा गैरवापर इतर राज्यातही सुरू आहे. पंजाब, राजस्थान मध्यप्रदेश आणि दक्षिणेतील काही राज्यांमध्ये हेच सुरू आहे, असं पवार म्हणाले.

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं विधान परिषदेतील आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर पवारांना विचारण्यात आलं असता पवारांनी या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादीने जी यादी राज्यपालांना दिली आहे त्यात राजू शेट्टी यांचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीत क्षेत्रात योगदान दिलं आहे. ते पाहून त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असा प्रस्ताव आम्ही राज्यपालांना दिलेला आहे. त्याचा अंतिम निर्णय राज्यापालांकडून आलेला नाही. त्यामुळे अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची आहे. पण आश्चर्य याचं वाटतं अशी विधानं कशी केली जातात ? आम्ही आमची कामं प्रामाणिकपणे केली आहेत. राजू शेट्टी यांना काय वक्तव्य करायचं असेल त्यावर भाष्य करायचं नाही. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात त्याची आम्ही वाट बघतोय, असं ते म्हणाले.

    दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला जात आहे. त्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. लाठीचार्ज ही गंभीरबाब आहे. त्याहीपेक्षा १४ महिने शेतकरी त्या ठिकाणी बसलेत. थंडी, ऊन आणि पाऊस याचा विचार न करता शेतकरी उपोषण करत आहेत. संवेदनशील राजकर्त्याने इतके दिवस अन्नदाता आंदोलन करतोय त्यांची नोंद घ्यायला हवी होती. पण दुर्दैव आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.