शिक्रापूरच्या पुढाऱ्यांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली

उपसरपंचांच्या सत्कारासाठी मंदिर व ग्रामपंचायत मध्ये गर्दी
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पदाचे ग्रहण लागलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीनंतर शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत असताना मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर सर्व प्रकार घडून देखील पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्यामुळे नाही पोलीस याकडे लक्ष देऊन कारवाई करणार का असा सवाल गावातील काही नागरिक करत आहे.
– अजूनही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही
शिक्रापूर ता. शिरूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयश्री दोरगे यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे नुकतीच उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये उपसरपंच पदी रोहिणी गिलबिले यांची वर्णी लागली मात्र उपसरपंच पदाची निवडणूक पार पडत असताना, शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली होती. तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्क देखील परिधान केलेले नव्हते.
-शिक्रापूर पोलीस प्रशासन अद्याप गप्प
तसेच नागरिक आणि गावचे पुढारी इतक्यावरच न थांबता त्यांनी ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरामध्ये नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी गिलबिले यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. यावेळी चाळीस हून अधिक नागरिकांनी एकत्र येत प्रचंड प्रमाणात गर्दी केली परंतु निवडीमध्ये उतावळे झालेल्या काही पुढार्‍यांना शासनाच्या नियमांचा विसर पडला उपसरपंच यांचा सत्कार करताना कोणीही मास्कचा वापर केला नाही तसेच सामाजिक अंतर पाळले नाही आणि प्रचंड प्रमाणात गर्दी एकत्र करून उपसरपंच गिलबिले यांचा सत्कार केला. यावेळी यामध्ये अनेक राजकीय नेते व पुढारी सहभागी झाले होते. त्यांनतर काही वेळात याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आणि गावातील काही नागरिकांकडून यावर कारवाई होणार का असे बोलले जाऊ लागले शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर सर्व प्रकार घडलेला असताना देखील शिक्रापूर पोलीस प्रशासन अद्याप गप्प आहे तर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाढदिवस पार्टी वर आणि डॉक्टरांच्या आखाड पार्टीवर तसेच बाजार समितीच्या सभापती निवडीनंतर सभापती वर गुन्हा दाखल करत कारवाई करणारे पोलीस याकडे लक्ष देऊन या वर गुन्हा दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-गावात जास्त कोरोनाबाधित असताना देखील पुढाऱ्यांना विसर
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून जास्त कोरोनाबाधित हे शिक्रापूर गावातील आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना गावातील पुढारीच नियम तोडत असल्याने कोरोना बाबतचा पुढाऱ्यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे.