शिक्रापूर पोलिसांनी हत्यारांसह अटक केलेल्या आरोपीवर खंडणीचा गुन्हा

    शिक्रापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिक्रापूर ता. शिरुर येथे तलवार हातामध्ये घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस तसेच तलवारसह जेरबंद केले. याने कोणाकडे खंडणी मागितली असल्यास तक्रार करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असताना वैभव संभाजी आदक याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर खंडणीसह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    शिक्रापूर ता. शिरुर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला हत्यारांसह नुकतेच जेरबंद केले. हा सराईत गुन्हेगार वेगवेगळ्या ठिकाणी हत्यारांचा धाक दाखवून खंडणी वसूल करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली असल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी नागरिकांना तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तळेगाव ढमढेरे येथील अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकास पिस्तुलाचा धाक दाखवून महिन्याला खंडणी दे, नाही दिली तर तुला जीवे मारुन टाकीन, अशी धमकी देत वैभव आदक व त्याच्या साथीदारांनी कंपनीच्या व्यवस्थापकाचा पाठलाग केला. त्याला शिवीगाळ, दमदाटी करत पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याची तक्रार अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रायवेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक संदीप मारुती पाटील (वय ४७ वर्षे रा. वैदहि सोसायटी कोथरूड पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली.

    पोलिसांनी वैभव संभाजी आदक (वय २३ वर्षे सध्या रा. शिक्रापूर ता. हवेली जि. पुणे मूळ रा. पठारे वस्ती अष्टापूर ता. हवेली जि. पुणे), अनिकेत पोपट ढोकले, आनंद पंडित कसबे (दोघे रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे), संदेश कोतवाल (रा. अष्टापूर ता. हवेली जि. पुणे) याच्याविरुद्ध हत्यार बाळगणे, खंडणी मागणे यांसह आदी प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहे.