शिक्रापूर पोलीस ठाण्याचा कर्मचारी अखेर निलंबित

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची कारवाई

शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरूर येथील पोलीस स्टेशन नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत असताना या पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये खोडसाळपणा करून पूर्व नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथे बावीस जुलै रोजी एम एच १४ एच पी ७२९१ हा वाळू वाहतूक करणारा ट्रक कारवाई करून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेला असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे यांनी काही इसमाच्या सहभागाने बेकायदेशीरपणे सदर ट्रक मधील वाळू वर दगडाचे बारीक क्रशखडी टाकून खोडसाळपणा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते, तर यावेळी पोलिसांवर कारवाई होणार का असे बोलले जात असताना सदर चौकशीमध्ये पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे बक्कल नंबर २१८८ यांनी गैरकृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत पांडूरंग इनामे यांना सेवेतून तात्काळ निलंबित केले असून त्यांचे विरुद्ध खातेनिहाय चौकशीचे आदेश देखील दिले असून याबाबत पत्रक देखील आज प्रदर्शित केले आहे.