प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने अध्यापन केले जात आहे. शाळा बंद आणि लॉकडाऊन मुळे मात्र मुलांचे खेळणेच बंद झाले आहे. बहुतांश मुले ही सव्वा वर्षांपासून घरातच बंदिस्त आहेत.

    पिंपरी: सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिकवणे सुरु रहावे यासाठी ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे’ तर्फे ऑनलाईन पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या सर्व बाबीचा विचार करून दर शनिवारी आता ऑनलाईन पद्धतीने ‘शिकू आनंदे ‘ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी होणार असून घरबसल्या शारीरिक व्यायामही होणार आहे.

    मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने अध्यापन केले जात आहे. शाळा बंद आणि लॉकडाऊन मुळे मात्र मुलांचे खेळणेच बंद झाले आहे. बहुतांश मुले ही सव्वा वर्षांपासून घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होत आहेत. भविष्यात त्या होऊ नये या पार्श्व्भूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या सामाजिक शास्त्र, कला, क्रीडा विभागामार्फत १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने ‘शिकू आनंदे ‘ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. ‘शिकू आनंदे’ या उपक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्याथ्र्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी, जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी, असे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी काढले आहे.

    असा आहे उपक्रम

    प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती आणि सकाळी १० ते ११ या वेळेत ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असण्याकरिता ड्रॉईंग कागद, पेन्सिल, खोड रबर, वॉटर कलर, स्केच पेन,पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.