आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी दक्ष राहावे : ज्ञानेश्वर कटके

    वाघोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महापालिका, जिल्हा परिषद,पंचायत समित्या यासह आगामी नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वत्र शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिवसैनिकांनी दक्ष राहावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियानातून शिवसैनिकांशी संवाद साधत आहोत. या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचवीत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली कटके यांनी सांगितले.

    शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. पूर्व हवेली तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यातील गावांत अभियान राबविण्यात आले. याला शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थ मोठा प्रतिसाद देत शिरूर-हवेलीत आबांच्या मार्गदर्शनाखाली भगवा फडकविणारच असल्याचे शिवसंपर्क अभियानातून शिवसैनिकांनी गर्जना केली आहे. यानुसार केसनंद, पेरणे, अष्टापुर, उरुळी कांचन, लोणी काळभोर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात कटके बोलत होते.

    कटके म्हणाले की, राज्यात शिवसेनाप्रणित महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याने तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आतापर्यंत घेतलेले लोकोपयोगी आणि धाडसी निर्णय यामुळे जनता शासनाच्या कारभारावर खूष आहे. कोरोना काळात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना विविध माध्यमातून मोठी मदत झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला स्पष्ट कौल मिळत असल्याने आगामी सर्व निवडणुकांत सर्वत्र शिवसेनेचा भागवाच दिसेल. यादृष्टीने शिवसंपर्क अभियानातून प्रयत्न केले जात आहेत. सर्वांनी अगदी मनापासून प्रयत्न केल्यास आणि शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचा ध्यास घेतल्यास शिवसेना सर्व निवडणुकांमध्ये चांगल्या जागा जिंकू शकते. याबाबत विश्‍वास असल्याचेही कटके यांनी सांगितले.