Video : पुण्यात नारायण राणेंच्या मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक तर भाजपच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्या

मुंबईत गोंधळ सुरू असतानाच पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या प्रसिद्ध आर. डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या कार्यकर्त्यांना आवर घातला. त्यामुळे मोठा गोंधळ टळला आहे.

    पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, मुंबईनंतर पुण्यात देखील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी पुण्यातील नारायण राणेंच्या आर. डेक्कन मॉलवर दगडफेक केली आहे. तर, भाजपच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्याचा प्रकार घडला आहे. घटनास्थळी डेक्कन पोलीस दाखल झाले आहेत. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. पोलीसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

    पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्यावर भादवी कलम १५३ व ५०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिवसैनिक रोहित कदम यांनी तक्रार दिली आहे.

    भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पतळीत भाष्य केले. त्यानंतर राणे व शिवसेनेत चांगलाच वादंग सुरू झाला आहे. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटत असल्याचे दिसत आहे. मुंबईत राणे यांच्या घरासमोर शिवसैनिक जमा झाले आहेत. तर, भाजप कार्यकर्ते देखील आले आहेत. एकमेकांच्या विरोधात घोषणा बाजीकरून परिसर दणाणून सोडला आहे.

    मुंबईत गोंधळ सुरू असतानाच पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या प्रसिद्ध आर. डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या कार्यकर्त्यांना आवर घातला. त्यामुळे मोठा गोंधळ टळला आहे. काचा फोडण्यात आल्या असून, येथे घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. त्यासोबतच भाजपचे या परिसरात कार्यालय आहे. त्याठिकाणी कोंबडी चोर असे म्हणत शिवसैनिकांनी कोंबड्या सोडल्या आहेत. पुण्यात भाजप व शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता गृहीत धरून पोलीसांनी बंदोबस्त ठेवला आहे.