‘भ्रष्ट भाजपचे करायचे काय, खाली डोकेवर पाय’; महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच शिवसेनेचे आंदोलन

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. भाजपच्या लाचखोरी विरोधात महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘चोर भाजप, दरोडेखोर भाजप’, ‘लूटमार नही चलेगी’, ‘महापालिका, स्थायी समिती बरखास्त करा’ अशा मागण्या शिवसेनेने केल्या आहेत.

    लाचप्रकरणी एसीबीने महापालिकेतून स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक), राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भीमराव कांबळे, (शिपाई) यांना अटक केली आहे. याविरोधात शिवसेनेने शुक्रवारी महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

    खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनंत को-हाळे, धनंजय आल्हाट, मधुकर बाबर, सचिन सानप, सरिता साने, अनिता तुतारे आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

    “नहीं चलेगी, नहीं चलेगी, लूटमार नहीं चलेगी, चोर भाजपा, डाकू भाजपा, दरोडेखोर भाजपा, बरखास्त करा, बरखास्त करा महापालिका बरखास्त करा, भ्रष्ट भाजपचे करायचे काय, खाली डोकेवर पाय, करदात्या नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या भाजप नगरसेवकांचा धिक्कार असो, पैसे नागरिकांच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे” असा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.