इंदूर दौऱ्यावरुन शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले…

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचा गेल्या आठवड्यातील छुप्या खासगी इंदूर दौऱ्यामागे कोट्यवधी रुपयांचे डस्टबीन वाटपाचे षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे यांनी केला. शिवसेना, मनसे व अपक्ष गटनेत्यांना डावलून फक्त राष्ट्रवादीच्याच गटनेत्याला घेऊन हा दौरा झाल्याने तो संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. या दौऱ्यात सामील झालेल्या राज्य सरकारमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेतील गटनेते राजू मिसाळ यांनाही कलाटेंनी लक्ष्य केले. या दौऱ्यात सहभागी होणार नाही, असे आदल्या दिवशी सांगणारे मिसाळ दुसऱ्या दिवशी त्यात कसे सामील झाले? अशी खोचक विचारणा त्यांनी केली.

    लग्नासाठी हा खासगी दौरा होता, असे त्यात सामील झालेले स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात ते इंदूर शहरातील कचरा वर्गीकरण पाहून आले. हे काम करणाऱ्या ठेकेदाराला पिंपरीतही हे काम आता दिले जाणार आहे. या दौऱ्यावरून आल्याानंतर मंगळवारी हे पदाधिकारी व त्यात सामील झालेल्या स्थायी समितीच्या इतर सदस्यांनी पत्रकार परिषद घेत इंदूरमधील कचरा विलगीकरण पॅटर्नचे कौतुक केले. एवढेच नाही, तर हा पॅटर्न पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. त्यानंतर कलाटे यांनी या दौऱ्यावर सडकून टीका केली. शहर स्वच्छतेला अजिबात विरोध नसल्याचे सांगत दौरा गुपचूप करण्याला जोरदार आक्षेप त्यांनी घेतला.

    अशा दौऱ्याचे फलित नसते, असे सांगत त्यांनी शहर स्वच्छतेसाठी: यापूर्वी झालेल्या अशाच दौऱ्याचा दाखला दिला. तो झाला आणि कोट्यवधी रुपयांच्या डस्टबीन वाटपाची निविदा निघाली. त्यामुळे आता पुन्हा या दौऱ्याची निष्पत्ती म्हणून करदात्यांवर असा कोट्यवधी रुपयांचा बोजा पडता कामा नये, असे ते म्हणाले. पालिकेत सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षात भाजपला शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यांचे कचरा व्यवस्थापन फेल गेल्याने इंदूरचा दौरा केला का असा सवाल त्यांनी विचारला. सत्तेतून आता जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांची ही तडफड सुरु झाली आहे. दिवा विझताना जसा फडफडतो, तशी ही आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.