पिंपरीकरांचा शास्तीकर माफ करा शिवसेना शहरप्रमुख अ‍ॅड.सचिन भोसले यांची मागणी

२०२० पर्यंतची गुंठेवारीतील घरे नियमित करावी. स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे संथ गतीने सुरु असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. त्याची चौकशी करून पारदर्शकता आणावी.

    पिंपरी: शहरातील सर्व सामान्यांच्या हजारो घरांवर शास्तीकराची टांगती तलवार कायम आहे. कोरोना महामारीमुळे बेरोजगारी तसेच आर्थिक मंदीच्या कात्रीत सापडलेल्या नागरिकांना शास्तीची मोठी धास्ती आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देत शास्तीकर पूर्णत: माफ करावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांनी केली आहे.

    पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या विकास कामांबाबत शिवसेना नेते, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीच्या अनुषंगाने शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. मेट्रोत स्थानिक तरुणांना शिक्षणानुसार प्राधान्याने नोकऱ्या द्याव्यात. महापालिकेचा आकृतीबंद मंजूर असूनही रखडलेली नोकर भरती प्रक्रिया त्वरित राबवावी. २४ तास पाणी पुरवठ्यासाठी राबविलेल्या अमृत योजनेचे काय झाले, धरण भरलेले असताना दिवसाआड पाणी का दिले जाते, १८ मजल्यापुढील बांधकाम प्रकल्पांना महापालिका परवानगी देते, त्यानुसार, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी, नवीन यंत्र सामग्री खरेदी करावी.

    २०२० पर्यंतची गुंठेवारीतील घरे नियमित करावी. स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे संथ गतीने सुरु असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. त्याची चौकशी करून पारदर्शकता आणावी. नाशिक फाटा उड्डाणपुलासाठी १३३ कोटी खर्च झाले. त्यापैकी येथील केवळ ३ रॅम्पसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्चूनही ते धूळखात पडले आहेत. ते जनतेच्या वापरात कधी येणार, असे प्रमुख प्रश्न भोसले यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. शिंदे यांनीही दखल घेत संबंधित अधिकाऱ्याना याबाबत तात्काळ सूचना दिल्या.