खेडमध्ये शिवसेनेवर झालेल्या अन्यायाचा शिवसेना राजकीय सूड घेणारच : खासदार संजय राऊत

बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. जनआंदोलन झाले की सरकार झुकते हा इतिहास आहे. त्यामुळे लोकभावना तीव्र असल्याने हा विषय निकाली काढू. पीएमआरडीएचा संचालक या नात्याने मी या आरक्षण षडयंत्रामागे कोण आहे, हे शोधून काढेन, असाही असा आशावाद राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

  राजगुरुनगर : शरद पवारांनी देशाचे नेतृत्व करावे, ही बाळासाहेब ठाकरे यांची ईच्छा होती. २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपाने युतीधर्माचे उल्लंघन करीत अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यामुळेच खेडसह अनेक ठिकाणी शिवसेनेचे आमदार पराभूत झाले. गद्दारांना माफी नाही, ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी बनवून भाजपचे सरकार पाडले असा गौप्यस्फोट शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. खेडमध्ये शिवसेनेवर झालेल्या अन्यायाचा आम्ही राजकीय सूड घेणारच, असा ईशारा त्यांनी दिला.

  राऊत यांनी चांडोली (ता. खेड) येथील  निलकमल मंगल कार्यालयात शनिवारी (दि. ४) शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार राजकीय टोलेबाजी केली. याप्रसंगी संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, अशोक खांडेभराड व शरद सोनवणे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट व रुपाली कड, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गावडे व ज्योती आरगडे, सेना पदाधिकारी शिवाजी वर्पे, विजया शिंदे, सुरेश चव्हाण, नंदा कड, बाळासाहेब ताये, नितीन गोरे, ऍड. विजयसिंह शिंदे पाटील, राजेंद्र गायकवाड, मारुती सातकर यांच्यासह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

  यावेळी राऊत यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवत त्यांच्या मनातील बाब बोलून दाखविली. “कार्यकर्त्यांनो कामाला लागा” असे आदेश देतानाच शिरुर व खेड-आळंदीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो, असे राऊत यावेळी म्हणाले. एकप्रकारे त्यांनी खासदार अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते यांना पराभूत करण्याचा मनसुबा बोलून दाखवला.

  शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, असा इशाराच संजय राऊत यांनी दिलाय. पक्षात थोडी शिस्त आणली की दिलीप मोहीते घरी बसतील. महाविकास आघाडीतील विषय सन्मानाने सोडविले जातात. मात्र खेडमध्ये विकृती आहे. मोहित्यांचे डोक्यात विष आहे, कचरा भरलाय, तो आम्ही काढणारच, असा थेट दमच त्यांनी यावेळी दिला. खेडमध्ये पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल, असा गर्भित इशारा राऊतांनी दिलीप मोहिते यांना दिलाय.

  सत्ता हा आमचा आत्मा किंवा प्राण नाही. खेडमध्ये जे राजकारण झालं ते गलिच्छ आहे. विद्यमान आमदारांना थोडी जरी माणुसकी असती तर असं घाणेरडं राजकारण केलं नसतं. आघाडी सरकारमध्ये विषय बसून सोडवले जातात. मात्र या आमदार जे काही घडलं त्याची नोंद ठेवली आहे. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. आज पोलीस आमचे कार्यकर्ते उचलत आहेत, उद्या आम्ही त्यांना उचलू. राजकारणात आमचा पिढीजात धंदा तो आहे. राजकीय कार्य़कर्त्यांनी सूड उगवायचं सोडायचं नसतं, असा इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिलाय.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन राऊतांनी केलं. मास्न न लावलेलं उद्धवजींनी पाहिलं तर आपली चंपी करतील, “आधी माझी आणि नंतर तुमची.” असेही ते काळजीने म्हणाले.

  भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरुन गेली. पाप केलं की कोरोना होतो. भाजपनं शब्द फिरवण्याचं पाप केलं, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केलीय. बाबरी पाडताना मंदिर वही बनायेंगे असं म्हणणारे पळून गेले होते. त्यांना विचारलं तर म्हणाले वो शिवसैनिक हो सकते है. तेव्हा बाळासाहेबांनी स्टेटमेंट दिलं की “जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्याला अभिमान आहे.” कडवट शिवसैनिक हा त्यांचा श्वास होता. गर्दी दिसली की बाळासाहेब ताजेतवाने व्हायचे. बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा ४० लाख लोक जमले. जगानं त्याची दखल घेतली. अशा महान नेत्याचे आपण पाईक आहोत. तुम्ही आमच्याशी गद्दारीची भाषा करता. बाळासाहेब नसते तर मुंबई विकली गेली असती. शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नका.  खेडमध्ये येण्याची ही माझी दुसरी वेळ आहे, असा इशारा राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलाय.

  आमचे शिवसैनिक आतमध्ये सडवले जात असतील तर ती वेदनाही मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे. समोर कोण आहेत याची पर्वा करु नका. आपण शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे. तिघांचा शत्रू एकच आहे. आपल्या भांडणात भाजप मोठा झाला नाही पाहिजे, असा मोलाचा कानमंत्र त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.

  बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. जनआंदोलन झाले की सरकार झुकते हा इतिहास आहे. त्यामुळे लोकभावना तीव्र असल्याने हा विषय निकाली काढू. पीएमआरडीएचा संचालक या नात्याने मी या आरक्षण षडयंत्रामागे कोण आहे, हे शोधून काढेन, असाही असा आशावाद राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

  यावेळी बोलताना राऊत म्हणाले की राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचे सरकार असते. त्याअर्थाने सरकार शिवसेनेचे आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस व राष्ट्रवादी) वर आहे. ही आपली पॉवर आहे, असे म्हणत राऊत यांनी  शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला डिवाचण्याचा प्रयत्न केला.

  यावेळी रविंद्र मिर्लेकर यांनी गद्दारांना गाडण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तोंडाने आवाज काढण्यापेक्षा कानाखाली आवाज काढा. शिवसंपर्क अभियानात शिवसैनिक कमी पडल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

  यावेळी आढळराव बोलताना म्हणाले की सन २००४ साली मी खेड तालुक्यामुळेच खासदार झालो. खेडमध्ये गेल्या तिमाहीत अनेक चुकीच्या घडामोडी घडल्या. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून शांत बसतो. शिवसैनिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा आधार घेत कर्नाटकात बैलगाडा शर्यत सुरु झाली. अमोल कोल्हे यांनी घोडीवर बसून प्रचार केला होता. त्याचा संदर्भ देत निवडणुकीनंतर ‘घोडी फरार व घोडाही गायब’ अशी खवचट टीका आढळराव यांनी केली. पीएमआरडीएचे संजय राऊत संचालक असल्याने ते शेतकऱ्यांना दिलासा देतील, असा विश्वास आढळराव यांनी यावेळी व्यक्त केला.

  यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या माध्यमातून १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक अँप देण्याचा उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. भाजपचे जेष्ठ नेते राम हरी आवटे, आकांक्षा हुंडारे, कल्याणी बोऱ्हाडे यांच्यासह काहींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी केशव आरगडे, ज्ञानेश्वर कटके, रामदास धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले तर आभार बाबाजी काळे यांनी मानले.

  दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघ हा गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवसेनेचा गड होता. शिवाजी आढळराव पाटील यांनी येथून खासदारकीची हॅटट्रिक केली. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांना रोखले. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर व शिरुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. नुकतेच खेड पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत सेनेची स्पष्ट सत्ता असतानाही राष्ट्रवादीने धोबीपछाड दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे राऊत यांनी खेडमध्ये येऊन राष्ट्रवादीला ईशारा देत शिवसेनेला सावरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते