आळंदी उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे आदित्य घुंडरे बिनविरोध 

  आळंदी : आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे आदित्य घुंडरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केली. या निवडीसाठी आळंदी नगरपरिषदेने ऑनलाइन विशेष सभेचे आयोजन केले होते.

  आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. याप्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, भाजपचे गटनेते पांडुरंग वहिले, शिवसेनेचे गटनेते तुषार घुंडरे, नगरसेविका प्रतिमा गोगावले, सुनीता रंधवे, मीरा पाचुंदे, स्मिता रायकर, नगरसेवक सागर भोसले, सागर बोरुंदिया, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, प्रमिला रहाणे, आदित्य घुंडरे, सचिन गिलबिले, प्राजक्ता घुंडरे, रुख्मिणी कांबळे यांचेसह नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर उपस्थित होत्या. या सभेत १६ सदस्यांनी भाग घेतला. २ नगरसेविका गैरहजर होत्या.

  आळंदीच्या उपनगराध्यक्षा पारुबाई तापकीर यांनी आपल्या पदाचा १४ दिवसांनी पक्षीय धोरणानुसार या पदावर इतर नगरसेवकांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. आळंदी नगरपरिषद ऑनलाइन विशेष सभेत उपाध्यक्ष निवडीसाठी शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे यांचा एका जागेसाठी चार प्रतीत एकमेव अर्ज आल्याने शिवसेनेचे आदित्य घुंडरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली.

  …म्हणून पारुबाई तापकीर यांचा राजीनामा

  आळंदीत ठराविक मुदतीनंतर इतर पदाधिकारी यांना संधी मिळावी यासाठी पदाचे राजीनामास्त्र उपसले जाते. त्याप्रमाणे इतर नगरसेवकांना संधी मिळावी म्हणून उपाध्यक्षा पारुबाई तापकीर यांनी राजीनामा दिला होता. यापूर्वी प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच, सात, आठ या प्रभागातील नगरसेवकांना या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. उर्वरित प्रभागतील नगरसेवकांत संधी मिळावी म्हणून खलबते सुरू होती. प्रभाग क्रमांक तीनला एकाच टर्ममध्ये सलग दुसर्‍यांदा उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती.

  नगरसेवकांच्या वतीने सत्कार

  प्रभाग क्रमांक ६ मधील इतर मागासवर्गीय राखीव गटातून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक घुंडरे यांच्या रूपाने काम करण्याची संधी प्रभाग क्रमांक ६ मध्ये देण्यात आली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांचा निवडीनंतर नगरध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह उपस्थित नगरसेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भंडा-याची मुक्त उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.