कामशेत येथील कृषी विभागाची जागा पोलीस ठाणे, वारकरी भवनासाठी मिळावी: शिवसेनेची कृषीमंत्र्यांकडे मागणी

पंढरपूरला वारीसाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी जात असतात. त्यासाठी वारकरी भवन उभारण्याकरिता जागेची गरज आहे. तसेच ग्रामपंचायतीसाठी आणि विविध सरकारी कार्यालयासाठी जागेची आवश्यकता आहे.

    पिंपरी: कामशेत येथील कृषी विभागाची मोकळी जागा कामशेत पोलीस ठाणे आणि वारकरी भवनाची इमारत आणि ग्रामपंचायत कार्यालय यासाठी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना मावळ तालुका कार्यकारीणीच्या वतीने करण्यात आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे एका कार्यक्रमासाठी मावळात आले होते. यावेळी शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

    कामशेत परिसराची झपाट्याने वाढ होत आहे. कामशेत येथे पोलिस ठाणे आहे. परंतु, ठाण्याची सध्याची इमारत अतिशय छोटी आहे. पोलीस ठाण्यासाठी प्रशस्त इमारतीची गरज आहे. मावळला संताची भूमी म्हणून पाहिले जाते. मावळात वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे. पंढरपूरला वारीसाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी जात असतात. त्यासाठी वारकरी भवन उभारण्याकरिता जागेची गरज आहे. तसेच ग्रामपंचायतीसाठी आणि विविध सरकारी कार्यालयासाठी जागेची आवश्यकता आहे. कामशेत येथे पुणे – मुंबई महामार्गाजवळ कृषी विभागाची मोकळी जागा आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन कृषी विभागाच्या मोकळ्या जागेत पोलीस ठाणे, वारकरी भवन आणि ग्रामपंचायत कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खांडभोर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.