शिवाजी विद्यापीठातर्फे कर्मचारी, रहिवाशांना सॅनिटायझर, मास्कच्या १००० कीटचे वाटप

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे आज विद्यापीठात अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणाऱ्या सेवकांबरोबरच विद्यापीठ कॅम्पसवरील रहिवाशांना सॅनिटायझर आणि मास्कच्या सुमारे १००० कीटचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे आज विद्यापीठात अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणाऱ्या सेवकांबरोबरच विद्यापीठ कॅम्पसवरील रहिवाशांना सॅनिटायझर आणि मास्कच्या सुमारे १००० कीटचे वाटप करण्यात आले. शिवाजी विद्यापीठामध्ये सुरक्षा, उद्यान, आरोग्य तसेच पाणीपुरवठा आदी अत्यावश्यक सेवांवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजाच्या निकडीनुसार आस्थापनासह अन्य काही विभागांतील कर्मचारीही कामकाजावर उपस्थित राहात असतात. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या विविध निवासस्थानांमध्ये अनेक शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि त्यांचे कुटुंबिय राहतात. कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घटकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षाच्या वतीने या सर्व घटकांना सॅनिटायझर व मास्क यांच्या कीटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाची सुरवात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली. येथे कार्यरत सुरक्षा रक्षकांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते कीट देऊन मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याही निवासस्थानी कार्यरत असलेल्या रक्षकांना त्यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या शिव सहाय्यता आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. अभय जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसच्या स्वयंसेवकांनी कॅम्पसवर कार्यरत सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि निवासी यांना कीटचे वाटप करण्यात आले. कीट वाटप करीत असताना कोरोनाच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचनाही सर्व संबंधितांना करण्यात आल्या.

-‘एनएसएस’चा कौतुकास्पद उपक्रम: कुलगुरू डॉ. शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएस कक्षातर्फे हाती घेण्यात आलेला सॅनिटायझर कीट वाटपाचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा व कौतुकास्पद आहे,असे मत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले. यामुळे सद्यस्थितीत आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या वस्तूंसाठी कॅम्पसवरील कोणालाही बाहेर जावे लागणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल. दिलेल्या मास्कमुळेही सार्वजनिक आरोग्य निकषांचे पालन केले जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कॅम्पसवरील कर्मचाऱ्यांनी घरी राहावे, सुरक्षित राहावे, या दृष्टीने एनएसएसचा उपक्रम महत्त्वाचा आहे. सर्वच कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुरक्षाविषयक निकषांचे पालन करून कोरोनाला पराभूत करावे,असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.