खेड घाट उद्घाटनात श्रेयवादाची लढाई; कोल्हे यांच्या अगोदरच आढळराव यांच्याकडून फळीफोड

  राजगुरूनगर : येथील पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळणवरील खेड घाटाचा उद्घाटन समारंभ शनिवारी (दि. १७) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आयोजित केला आहे. मात्र, त्याअगोदरच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी या घाटात वाहनांना भगवा झेंडा दाखवून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

  याप्रसंगी जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे व रुपाली कड, नितीन गोरे, विजया शिंदे, मारुती सातकर, ऍड. विजयसिंह शिंदे पाटील, सागर काजळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

  यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादीवर राजकीय कुरघोडी केली आहे. सध्या सगळीकडेच राजकीय वातावरण तापले असून उद्या शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारायणगाव बाह्य वळण व खेडचे बाह्यवळण खेडचे आमदार दिलीप मोहिते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या होणार होते. पण शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव व कार्यकर्त्यांनी आजच सायंकाळी उद्घाटन करून आघाडीचा धर्म मोडीत काढून उद्घाटन करून राष्ट्रवादीवर राजकीय कुरघोडी केली.

  कोल्हेंचे कामात योगदान नाही

  आढळराव यांनी कोल्हे यांच्यावर कडवट टीका केली. कोल्हे यांचे या कामात काहीच योगदान नाही. त्यांनी आतापर्यंत एक रुपयाचाही निधी आणला नाही. अजूनही काम अपूर्ण आहे. तरीही कोल्हे श्रेयवादाची लढाई लढत आहेत. या संपूर्ण कामावर माझा अधिकार आहे. उद्याचा राष्ट्रवादीचा कार्यक्रम हे अघोरीपणाचे लक्षण आहे.

  दरम्यान, आढळराव यांच्या या कृत्यावर उद्या कोल्हे व मोहिते काय प्रत्युत्तर देतात याबद्दल खेडमध्ये औत्सुक्य वाढले आहे.