धक्कादायक! महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मीटर रुममध्ये कोंडले

वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यावर आरोपी चिडून वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचार्‍याला मीटर रुममध्ये कोंडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    पुणे: थकीत वीज बिलावरून महावितरण कर्मचारी व ग्राहकांमध्ये सातत्याने खटके उडताना समोर येत आहे. बिल भरण्यास सांगणाऱ्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर आता वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचार्‍याला मीटर रुममध्ये कोंडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सलीम बशीर सय्यद (वय ४१, रा. सुखनिवास, एस आर ए बिल्डिंग, मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. याप्रकरणी माधुरी सुनिल कुलसंगे (वय २८, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

    सलीम सय्यद यांचे ११ हजार ४८१ रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने फिर्यादी यांना दिलेल्या कामानुसार त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यावर आरोपी चिडून मीटर रुमच्या दरवाज्यासमोरुन फिर्यादींच्या अंगावर धावत आला. आमची कट केलेली लाईट चालू कर, नाही तर मी तुला येथेच रुममध्ये कोंडून ठेवेन, असे धमकावले. त्या समजावून सांगत असताना मीटर रुमची बाहेरुन कडी लावून फिर्यादी यांना आत कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी कार्यालयातील ऑफिस असिस्टंट शैलेश धुमाळ यांना फोन करुन बोलावून घेतले. धुमाळ यांनी त्यांची सुटका केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.