पिंपरीत तरुणाचा खून; १७ जणांविरोधात गुन्हा दाखल

रोपीने त्याचा मोबाईल हिसकावत आणि अक्षयला मारहाण केली. टेरेसवरुन खाली फेकून देत घटनास्थळावरुन पळ काढला. अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    पिंपरी: पिंपरीत २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पहाटे तीनच्या सुमारास राही अपार्टमेंट, पिंपरीगाव याठिकाणी हा प्रकार घडला. अक्षय अनिल काशिद (वय २०, रा. पवारनगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी २८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा बाळू पारधे उर्फ बॉक्सर, बाळ्या, तौसीफ, सचिन सौदाई, अजय टाक, जतीन मेवानी, अनिल पिवाल, कपिल टाक, तरुण टाक, आतिश ननावरे, जय पिवाल, विनय बेद, सद्दाम शेख, खलील शेख, अरुण टाक, जतिन टाक, खुबचंद मंगतानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी महिला घराच्या बेडरुममध्ये पती व मुलीसह झोपल्या होत्या. तर पाठीमागील बेडरुममध्ये फिर्यादी यांचा मामेभाऊ कृष्णा बाळू पारधे व त्याची पत्नी सिमरण झोपले होते.सदनिकेचा दरवाजा कोणीतरी वाजू लागल्यावर फिर्यादी महिलेने दरवाजा उघडला. तेव्हा अक्षय अनिल काशिद दरवाजामध्ये उभा होता. त्या महिेलेने अक्षयला तु इतक्या रात्रीचा इथे कशाला आला’, अशी विचारणा केली. त्यावेळी अक्षयने महिलेला शिवीगाळ केली. हा आरडाओरडा ऐकून बेडरुममध्ये झोपलेला फिर्यादीचा मामेभाऊ कृष्णा पारधे बाहेर आला. त्याने अक्षयला ‘तु कोण आहेस व तु इथे काय करतोस’, अशी विचारणा केली. फिर्यादी महिलेने त्याची ओळख सांगत माझ्या सोबत लग्न करणार असल्याचे सांगितले.

    त्यावेळी कृष्णा पारधीने अक्षयला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यानंतर कृष्णा त्याच्या पत्नीला सोडवण्यासाठी घरी गेला. सोबत येताना तो आरोपी बाळ्या व तौसीफ यांना घेऊन आला. त्यानंतर गच्चीवर असलेल्या अक्षयला या तिघांनीही मारहाण केली. भेदरलेल्या अक्षयने महिलेचा मोबाईल घेऊन पोलीसांना फोन केला. ‘मला पोलीस मदत पाहीजे’ असे सांगितले. मात्र, आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावत आणि अक्षयला मारहाण केली. टेरेसवरुन खाली फेकून देत घटनास्थळावरुन पळ काढला. अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिसाळ अधिक तपास करीत आहेत.
    ————————