धक्कदायक! डॉक्टर नसल्याचे कारण देत शवविच्छेदन करण्यास नकार ; मृतदेह चार तास रुग्णवाहिकेतच

शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

  शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील एका २४ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत नातेवाईकांच्या उपस्थितीत मृतदेह तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. मात्र, त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने मृतदेह तब्बल चार तास शवविच्छेदनविना रुग्णवाहिकेतच पडून असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

  तळेगाव ढमढेरे येथील श्यामल लक्ष्मण बागुल या युवतीने मंगळवा (िद. १ रोजी ) बारा वाजण्याच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत नामदेव विष्णू बागुल (वय ५५रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलिस नाईक अमोल चव्हाण, भरत कोळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवला. मात्र, या आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण सांगत मृतदेह शवविच्छेदनसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगण्यात आले.

  दरम्यान, मृत मुलीच्या नातेवाईक व पोलिसांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता सदर ठिकाणी कोविड सेंटर असल्यामुळे शवविच्छेदनासाठी अधिकारी नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, चार वाजेपर्यंत मृतदेह रुग्णवाहिकेतच पडून होता. पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सदर ठिकाणी शवविच्छेदन करण्याची विनंती केली. त्यानंतर शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका तायवडे यांना शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, डॉक्टरअभावी मनस्ताप सहन करावा लागल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

  सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे?

  आमच्या भगिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर ‘येथे डॉक्टर नाहीत. तुम्ही ससून येथे जा’, असे सांगण्यात आले. आमच्याकडे लोक आहेत म्हणून आम्ही जाऊ शकतो. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचे काय?
  -अंकित बागुल, मयत युवतीचे नातेवाईक

  मला जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ढमढेरे येथे कोविड ड्युटीसाठी नेमलेले आहे. सध्या येथे मेडिकल ऑफिसर उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना ससून येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाण्याबाबत सांगण्यात आलले आहे.

  -डॉ. स्म्रिती यादव, वैद्यकीय अधिकारी

  कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा
  तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी असून, एक वैद्यकीय अधिकारी कित्येक महिने झाले दिसलेच नाहीत. एकट्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे सर्व कामकाज पाहत आहेत. मात्र, प्रशासनाने तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय घुले यांनी केली.