धक्कादायक! फळांच्या गोण्यातून गांजा तस्करी ; १ हजार ८७८ किलो गांजा जप्त , आरोपींना कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरून टीएस ०७ यूएए ७९७९ या क्रमांकाचा आयशर ट्रक जात होता. या ट्रकमध्ये अननस आणि जॅक फ्रूट होते. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फळांचे ४० बॉक्स आढळले. त्या बॉक्सच्या खाली गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये १ हजार ८७८ किलो गांजा होता.

    पुणे : जवळपास १,८७८ किलोच्या गांजा तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीला एनडीपीएस न्यायालयाने २१ जुलैपर्यंत महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला, तर अन्य पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश अजित मरे यांनी हा आदेश दिला. त्यानुसार धर्मराज शिंदे याला डीआरआय कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अभिषेक धावटे, श्रीनिवास पवार, विलास पवार, अविनाश भोंडवे व विनोद राठोड यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    केंद्रीय महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी १,८७८ किलो गांजा तस्करीप्रकरणी या सहा जणांना जेरबंद केले होते. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गांजा आणण्यात आरोपी धर्मराज शिंदेची मुख्य भूमिका असल्याने पुढील तपासासाठी त्याला कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी केली. त्यावर आरोपी धर्मराजने तपासात या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले असून, त्याला कोठडी देण्याची गरज नाही, असा दावा बचाव पक्षातर्फे करण्यात आला. कोर्टाने विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करून आरोपी धर्मराज शिंदे याला ‘डीआरआय’ कोठडी सुनावली.

    -अननस, फणसाच्या गोण्यातून गांजा तस्करी
    ही शहरातील आतापर्यंतची सर्वांत मोठी गांजा तस्करी उघडकीस आली असून, आरोपींनी अननस व फणसाच्या गोण्यांमध्ये फळांखाली गांजा लपवून ठेवला होता. हा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याचे मूल्य अंदाजे पावणेचार कोटी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

    -आंध्रप्रदेशातून आणला होता गांजा
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरून टीएस ०७ यूएए ७९७९ या क्रमांकाचा आयशर ट्रक जात होता. या ट्रकमध्ये अननस आणि जॅक फ्रूट होते. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये फळांचे ४० बॉक्स आढळले. त्या बॉक्सच्या खाली गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये १ हजार ८७८ किलो गांजा होता. त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये इतकी किंमत होत असल्याचे सांगण्यात आले. तर या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी आंध्रप्रदेशातून गांजा आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी अनेक जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.