धक्कादायक! सुनेने ब्लाऊजने आवळला सासूचा गळा ; मृतदेह लपवण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

पूजा शिंदे आणि तिचा पती म्हणजेच मृत महिलेचा मुलगा मिलिंद शिंदे अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना ५० वर्षीय बेबी शिंदे यांची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय.

    पुणे : जिल्ह्यातील तळेगावमध्ये किरकोळ कारणावरून सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस चौकशीदरम्यान खुनाचं मूळ कारण पुढे आलं आहे. अडीच वर्षीय नातवाने आजीचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला होता. तो, खेळत असताना फुटला यावरून आजीने नातवाला सुनावलं तसेच मोबाईल कोण भरून देणार यावरून सुनेचे आणि सासूचे वाद झाले. यातूनच घरातील ब्लाउज घेऊन अडीच वर्षीय मुलासमोरच सुनेने सासूचा गळा आवळून खून केला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

    पूजा शिंदे आणि तिचा पती म्हणजेच मृत महिलेचा मुलगा मिलिंद शिंदे अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना ५० वर्षीय बेबी शिंदे यांची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूजा आणि मिलिंद या दोघांचं २०१७ साली लग्न झालं. शिंदे कुटुंबात सासू बेबी शिंदे, दिर असा चार जणांचं एकत्रित कुटुंब होतं. दरम्यान, काही महिन्यातच सून पूजा आणि सासू बेबी यांच्यात खटके उडण्यास सुरवात झाली. दोघींचं अजिबात पटत नव्हतं, अनेकदा किरकोळ करणावरुन या दोघींमध्ये अगदी टोकाचे वाद व्हायचे. नातू झाल्यानंतर तरी सासू सुनांचा वाद मिटेल असं घरातील व्यक्तींना वाटत होतं. मात्र, तसं काही झालं नाही. दिनांक २१ मे रोजी नातवाने आजीचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला होता. तो त्याच्याकडून फुटला यावरून पूजा आणि तिच्या सासूमध्ये मोठा वाद झाला. याच वादातून पूजाने अडीच वर्षीय मुलासमोरच ब्लाउज ने सासूचा गळा आवळून खून केला.