पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन ; रिंगरोडविरोधात कृती समिती अध्यक्ष आक्रमक

बाधित शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर रातोरात शिक्के टाकले आहेत. हरकतींवर सुनावणी घेतल्याशिवाय मोजणी करू नये, अशी कळकळीची विनंती बाधित शेतकऱ्यांनी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. आमची बागायती जमीन घेऊ नका त्याऐवजी पडजमीन, वनजमीन, जिरायत क्षेत्र घ्यावे, असे शेतकरी प्रतिनिधी प्रसाद घेनंद यांनी सांगितले.

    राजगुरूनगर : रिंगरोडविरोधात आठवा दिवस असूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कृती समिती अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरूनगर (ता. खेड) येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. सकाळी पावणे सहा वाजता त्यांनी अचानकपणे असे आंदोलन चालू केल्याने प्रशासनाची धावपळ झाली. पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी गवारी यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उपविभागीय अधिकारी यांनी आठ दिवसात आमची भेटही घेतली नाही असे ते उद्विग्नपणे बोलत आहेत. ईतर आंदोलकांनी त्यांना समजावून सांगितले मात्र काही उपयोग झाला नाही. आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

    बाधित शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर रातोरात शिक्के टाकले आहेत. हरकतींवर सुनावणी घेतल्याशिवाय मोजणी करू नये, अशी कळकळीची विनंती बाधित शेतकऱ्यांनी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. आमची बागायती जमीन घेऊ नका त्याऐवजी पडजमीन, वनजमीन, जिरायत क्षेत्र घ्यावे, असे शेतकरी प्रतिनिधी प्रसाद घेनंद यांनी सांगितले. आमचा ‘रिंगरोड हटाव, शेतकरी बचाव’, ‘हुकूमशाही सरकारचा जाहीर निषेध’, ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ अशा घोषणा गवारी देत होते. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी भेट देऊन गवारी यांच्याशी संवाद साधला. महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाला साडे तीन तास झाले तरी प्रांताधिकारी न फिरकल्याने शेतकरी आक्रमक झाले, त्यामुळे वातावरण गंभीर झाले आहे.