पिंपरी चिंचवडमधील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार – महापौर उषा उर्फ माई ढोरे

अत्यावश्यक सेवा मधील दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहतील, तसेच अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहतील, अशी माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. याबाबत आयुक्तांनी आदेश जारी केला आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोविड -१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी अत्यावश्यक सेवा मधील दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहतील, तसेच अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहतील, अशी माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. याबाबत आयुक्तांनी आदेश जारी केला आहे. यासंदर्भात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दुकानदारांच्या मागणीविषयी आज सकाळी दुकाने सुरु करण्याबाबत चर्चा केली होती, त्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी सदरचा निर्णय घेण्यात आला.

    साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोविड-१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी दिनांक १५ जून २०२१ रोजी सकाळी सात वाजेपर्यंत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील. रेस्टॉरंट व बार यांना फक्त पार्सल/घरपोच सेवा देता येईल. ई – कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरु करणेस मुभा राहील. दररोज दुपारी तीन नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण / अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध ( संचारबंदी ) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी असेल. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी – बियाणे , खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. सदर आदेश दि. ०१.०६.२०२१ पासून पुढील १० दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील. त्यानंतर कोविड पॉझिटिव्हीटी बाबतचा आढावा घेवुन कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे प्रमाण वाढल्यास त्याअनुषंगाने सुधारित आदेश निर्गमित करण्यात येतील. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती कारवाईस पात्र राहतील, असेही महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी माहिती देतांना सांगितले.