मंचर शहरातील दुकाने पाच नंतर बंद राहणार

मंचर : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासन आणि व्यापारी यांनी मंचर शहर बुधवार दि.२६ पासून रोज सायंकाळी ५ नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती मंचर शहर महाव्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योजक अजय घुले यांनी दिली. मंचर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला महसिलदार रमा जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक खराडे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, खत आणि व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश मोरे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे,उद्योजक सचिन काजळे सोमनाथ खुडे, भरत शेठ मेंगडे,आशिष पुंगलिया, प्रशांत थोरात,बँकेचे ज्येष्ठ संचालक गणपतराव कोकणे यांच्यासह विविध व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

गेल्या पंधरा दिवसात मंचर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली होती.मंचर शहरात आजुबाजूच्या सुमारे ३५ गावातील नागरिकांचा विविध कामानिमित्त संबंध येतो. सायंकाळी पाचनंतर शहरातील दवाखाने, मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. तसेच दुकाने चालू ठेवलेल्या वेळेत दुकानदाराने मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानात जास्तीत जास्त पाच लोकांच्या व्यतिरिक्त इतर ग्राहक आढळून आल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाईल. रस्त्यावर सायंकाळी ५ नंतर बसणाऱ्या भाजीपाला विक्रीसाठी ही निर्बंध घालण्यात आले आहे. नियमांचे पालन न झाल्यास संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्क वापरणे बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्याचा बडगा उचलावा लागेल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिला आहे. प्रशासनाला सर्व दुकानदार आणि ग्रामस्थांनी सहकार्य करुन कोरोना मुक्त मंचर शहर करण्यासाठी सहकार्य करावे.असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे.