कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयातील नियंत्रीत बेडस्ची कमी ;अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

- संख्या ८० टक्क्यावरून ४० टक्क्यांपर्यंत

    पुणे :  शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक बेडस् रिकामे झाले आहेत. विशेषत: महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालयातील ८० टक्क्यांऐवजी ४० टक्के बेडस् संबधित रुग्णालयांनी त्यांच्या गरजेनुसार वापरावेत, अशी सूचना करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

    अग्रवाल यांनी सांगितले, की शहरातील कोरोना रुग्णसंख्या बर्‍यापैकी कमी झाली आहे. परंतू कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक कामाशिवाय गर्दी करू नये, तसेच कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे. जेणेकरून तिसरी लाट येणारच नाही, यासाठी नागरिकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

    शहरात रुग्णसंख्या वाढली तेंव्हा पालिकेने खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् स्वत:च्या नियंत्रणाखाली घेतले होते. त्यामुळे अधिकाअधिक कोरोना बाधितांना उपचार देणे शक्य झाले. परंतू ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या तसेच दररोज आढळणार्‍या रुग्णांची संख्याही बर्‍यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील ४० टक्के बेडस्च पालिकेच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार असून उर्वरीत बेडस्चा वापर संबधित रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणार्‍या अन्य आजाराच्या रुग्णांसाठी करण्यास हरकत नसल्याचे रुग्णालयांना कळविण्यात येणार आहे. परंतू दुर्देवाने पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यास खाजगी रुग्णालयातील नियंत्रणाखालील बेडस् ४८ तासांत ताब्यात घेण्याची तजवीज ठेवण्यात येणार आहे.