पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

-आमदार लक्ष्मण जगताप यांची तक्रार

    पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील ऑक्सिजन पुरवठादार हे साठा असूनही कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तुटवडा असल्याचे सांगून टाळाटाळ करत आहेत. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही काळाबाजार सुरू आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, त्याची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी. त्यावर तातडीने उपाययोजना करून पिंपरी-चिंचवडसाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

    यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज दोन हजारच्यावर रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्षात महापालिका प्रशासन आणि कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन कमी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्ण खाजगी कोविड रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. खासगी कोविड रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेतील सामान्य रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज वाढल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. ऑक्सिजन बेड व आयसीयू बेड मिळविण्यासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.

    शहरातील ऑक्सिजन पुरवठादार हे साठा असूनही कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तुटवडा असल्याचे सांगून टाळाटाळ करत आहेत. परिणामी ऑक्सिजनअभावी मोठ्या प्रमाणत रुग्ण मृत्यमुखी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचे दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असून आपले सूचना-आदेश न जुमानणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी. गंभीर तसेच ऑक्सिजनवर गेलेल्या रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. परंतु, रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शहरात मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. ऑक्सिजन पुरवठादार, अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन तत्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.”