‘रेमडेसिवीर इंजेक्शन’चाआंबेगावात तुटवडा

पुण्याला जाऊनही इंजेक्‍शन मिळेना
मंचर : आंबेगाव तालुक्‍यात कारोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांना देण्यासाठी आवश्‍यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यात जाऊनही हे इंजेक्‍शन मिळत नसल्याच्या तक्रारी करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्या आहेत, तसेच इंजेक्‍शनाचे दरही सर्वसामान्य व्यक्‍तीच्या आवाक्‍यात असायला हवे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

घरातील एक व्यक्ती जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली तरी घरातील इतर सदस्यांना करोनाची बाधा होत आहे. कितीतरी नागरिक करोनाचा संसर्ग झाल्यानंतर घरात किंवा इतरांना कल्पना न देता आजाराची लक्षणे असूनसुद्धा दुखणे अंगावर काढत आहेत. सध्या बेड उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करावे लागत आहे. त्याठिकाणी रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्‍शन उपलब्ध होत नाही.

-इंजेक्‍शचा पुरवठा त्वरीत व्हावा
इंजेक्‍शन विकताना अवाजवी पैसे घेऊ नये, इंजेक्‍शनच्या मूळ किमती इतकीच रक्‍कम ग्राहकांकडून घ्यावी, असे नियम असले तरी अतिरिक्त किंमत देऊन हे इंजेक्‍शन घ्यावे लागत आहे. कित्येक रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्‍शन आणण्यासाठी पुण्याला जावे लागत आहे. मात्र, तेथेही इंजेक्‍शन मिळवताना त्यांची धावपळ होत आहे. इंजेक्‍शचा पुरवठा त्वरीत व्हावा, रुग्णाच्या नातेवाइकांची धावपळ होऊ नये आणि रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तालुक्‍यातील डॉक्‍टर, होलसेलर आणि औषध विक्रेत्यांनी सहकार्य करणे आवश्‍यक आहे, असे मत पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी व्यक्त केले.

“ग्रामीण भागात अनेक व्यक्ती आरोग्य विमा काढत नाहीत, त्यामुळे एवढे महागडे इंजेक्‍शन घ्यायची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. परिणामी दुखणे अंगावर काढल्यानंतर दुखणे बळावते. त्यातच रुग्णाचा मृत्यू होतो. यासाठी सरकारने तातडीने ग्रामीण भागात हे इंजेक्‍शन वाजवी किमतीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, यासाठी प्रयत्न करावेत.”
– डॉ. विनायक खेडकर, वैद्यकीय तज्ज्ञ