पुणे महापालिकेतीलअतिक्रमण विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता

अतिक्रमण निर्मूलन विभागानेच महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे त्याबाबत मागणी केली असून ही रिक्त पदे तातडीने भरल्यास अतिक्रमण कारवाईला अधिक वेग देता येईल, असे स्पष्ट केले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पदपथांवरील अतिक्रमणात वाढ झाली आहे. या अतिक्रमणांमुळे होणारी गर्दी ही चिंतेची बाब असून त्यांच्यावर वारंवार कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निरीक्षकांची आवश्यकता आहे.

    पुणे : शहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हा कळीचा मुद्दा ठरत असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे १९८ पैकी केवळ १६ अधिकारी, कर्मचारी नियुक्तीस आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे काढण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असून तातडीने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे.

    अतिक्रमण निर्मूलन विभागानेच महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे त्याबाबत मागणी केली असून ही रिक्त पदे तातडीने भरल्यास अतिक्रमण कारवाईला अधिक वेग देता येईल, असे स्पष्ट केले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पदपथांवरील अतिक्रमणात वाढ झाली आहे. या अतिक्रमणांमुळे होणारी गर्दी ही चिंतेची बाब असून त्यांच्यावर वारंवार कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निरीक्षकांची आवश्यकता आहे. महापालिकेने या कारवाईसाठी जवळपास १९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे निश्चित केली असून प्रत्यक्षात मात्र २२ व्यक्ती या ठिकाणी नियुक्तीस आहेत. त्यातील पाच सहायक निरीक्षकांपैकी एक निरीक्षक ‘पीएमआरडीए’कडे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. तर, दोघे सहायक निरीक्षकांबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार ते अकार्यकारी पदांवर नोकरी करत आहेत. अतिक्रमण निरीक्षकांमध्येही तीन निरीक्षक दुर्धर आजाराने वैद्यकीय रजेवर आहेत. केवळ सात अतिक्रमण निरीक्षक सध्या नियुक्तीस आहेत.

    शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता तसेच शहराच्या मध्यवस्तीत पदपथांवरील अतिक्रमणे हा कळीचा मुद्दा ठरला आहे. कोरोनामुळे या ठिकाणी बेकायदा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होणे गरजेचे आहे. या व्यवसायांच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने ‘सुपर स्प्रेडर’वर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे.

    शहरातील रस्त्यांवर होणारी अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यानंतर ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही अतिक्रमणे काढण्यासाठी कारवाई करण्यात येते. मात्र, या कारवाईसाठी तसेच अतिक्रमणांच्या पाहणीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्याचा परिणाम अतिक्रमणे वाढण्यावर होत असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.