‘पंचायत समिती सदस्य दाखवा अन् ५५१ रुपये मिळवा’; भारतीय विद्यार्थी सेनेकडून खेडमध्ये फ्लेक्सबाजी

    राजगुरूनगर : ‘पंचायत समिती सदस्य दाखवा आणि ५५१ रुपये मिळवा’ अशी उपरोधिक फ्लेक्सबाजी भारतीय विद्यार्थी सेनेकडून येथील पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली. खेड पंचायत समितीचे सदस्य २४ मेपासून राजकीय सहलीवर गेले आहेत. यावेळी पंचायत समितीला कोणी वाली राहिला नाही, असे टीकास्त्र विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख श्रीनाथ लांडे यांनी सोडले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते मारुती सातकर, शिवसेना विभागप्रमुख राहुल मलघे, धनंजय पठारे, सचिन चौधरी, मयुर रणपिसे, अनिकेत घनवट आदी उपस्थित होते.

    सभापती भगवान पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर तालुक्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. एकूण १४ सदस्यांपैकी ११ सदस्य फिरतीवर आहेत तर स्वतः सभापती व माजी उपसभापती यांचे पतीमहोदय गजाआड आहेत. उर्वरित एकमेव काँग्रेसचे सदस्य अमोल पवार यांनी मध्यंतरी पंचायत समितीत येऊन “या चिमण्यांनो परत फिरा रे” अशी साद घातली. मात्र, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने तेही पुन्हा फिरकले नाहीत.

    अविश्वास ठरावाची सुनावणी उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने २ महिन्यांपासून खेड पंचायत समितीचा कारभार रामभरोसे चालू आहे.

    यावेळी बोलताना सातकर म्हणाले की, सध्या शेतीच्या हंगामात बी-बियाणांचा तुटवडा भासत आहे. कृषी विमा योजनेसाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. तालुक्यात कोविड लसीकरणाचा फज्जा उडाला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी मोठया अपेक्षेने निवडून दिलेले सदस्य उपस्थित राहत नाहीत. त्यांचे फोन स्विच ऑफ येतात. १५ व्या वित्त अयोगातून अनेक कामे करण्यात आली. मात्र, त्याच्या मार्गदर्शन प्रणालीत बदल झाल्याचे सांगून ठेकेदारांची बिले गटविकास अधिकाऱ्याने अडवून ठेवली आहेत. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी पंचायत समितीत हजेरी लावावी, अशी पोटतिडकीने विनंती सातकर यांनी यावेळी केली.

    विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख श्रीनाथ लांडे म्हणाले की, पंचायत समितीत भोंगळ कारभार चालू आहे. तालुका आरोग्य अधिकारी लसीकरण मोहिमेत अपयशी ठरले आहेत. भीमाशंकर खोऱ्यात अतिवृष्टी झाली आहे. मात्र कोणीही जवाबदारीने काम करत नाही. सदस्यांनी जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगावी. नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीमुळे आमच्यावर नाईलाजास्तव ‘पंचायत समिती सदस्य दाखवा आणि ५५१ रुपये मिळावा’ अशी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मत मागताना पाया पडले आणि आता वाऱ्यावर सोडले असा घणाघाती आरोप लांडे यांनी केला.