भाजपाचा अभेद्य भोसरीचा गड ढासळण्याचे संकेत; असंतुष्टांसह संतुष्टांचे धाबे दणाणले

गेल्या साडेचार वर्षात जे काही मिळालं ते त्यांना मिळालं, आम्हाला काय मिळालं ? आम्हाला मिळवण्याची आलेली संधी सुध्दा त्यांनी हिरवून घेतली, अशा भावना व्यक्त करत नगरसेवक व कार्यकर्ते पक्षावर नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

    पिंपरी: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे मनोबल खचू लागले आहे. भोसरी पट्ट्यातील अनेक नगरसेवकांनी पालिकेत येणेजाणेच बंद केले आहे. आता प्रत्येक जण भाजपाच्या बुडत्या जहाजातून स्वत:ला वाचवण्यासाठी तयारीत आहे. यावरून आगामी काळात भोसरी हा भाजपाचा अभेद्य गड ढासळण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या साडेचार वर्षात काहीच मिळाले नाही. आता पुढील सहा महिन्यात तरी काय मिळणार ? असा प्रश्न उपस्थित करत अनेकजण निराशेच्या गर्देत अडकल्याचे चित्र आहे. अशातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर असंतुष्टांसह संतुष्टांचे धाबे दणाणले असून अनेकांची पाचावर धारण बसली आहे.

    पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणण्यात भोसरीचे मोठे योगदान आहे. कारण, पालिकेत भोसरीतील ३० ते ३५ नगरसेवक भाजपाचे आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या करिष्म्यामुळे पालिकेवर भाजपाची सत्ता आली. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष, प्रोटोकॉल, पारदर्शक कारभार वगैरे नावे ऐकून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी नागरिकांची कामे करायला सुरूवात केली. बघता बघता सत्तेची साडेचार वर्षे संपली. गेल्या साडेचार वर्षात प्रभागातील पन्नास टक्के सुध्दा कामे करण्यात आपल्याला यश आले नाही. महेश लांडगे यांनी भोसरीला दोन महापौर दिले. त्यातील महापौर नितीन काळजे यांच्या काळात भोसरीला काहीच मिळाले नाही. जे काही मिळाले ते च-होली गावाला मिळाले.

    काळजे यांच्या काळात च-होलीत साडे चारशे कोटींहून अधिक खर्चाचे रस्ते मंजूर झाले. परंतू, ज्या भागात बड्या धेंड्यांचे टोलेजंग गृहप्रकल्प उभे होत आहेत. त्यातील सदनिकांना भाव मिळावा म्हणून रस्ते मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. काळजे यांच्या कार्यकाळात निर्णय झालेला एकही प्रकल्प आज पूर्णत्वाला गेलेला नाही. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिक देखील भाजपावर आता नाराजी व्यक्त करू लागले आहेत. जाधववाडीचे नगरसेवक राहूल जाधव यांना देखील महापौर पद दिले. पदावर बसताच जाधव यांनी शहराला मोकळा श्वास घेण्यासाठी डीपी रस्ते होणे गरजेचे आहे, यासाठी सर्व डीपी रस्त्याच्या आरक्षीत जागा ताब्यात घेऊन रस्ते करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना शहरातीलच काय त्यांच्या प्रभागातील सुध्दा डीपी रस्ते करता आले नाहीत. याशिवाय, त्यांनी महापालिकेत सर्वच शाळांचा कायापालट करण्याचा संकल्प केला होता. दररोज नित्यनियमाचा कार्यक्रम लावून त्यांनी पालिकेच्या सर्व शाळा पिंजून काढल्या होत्या. पण शाळेचा बाकडा सुध्दा बदलला गेला नाही. आहे तीच गुणवत्ता, तोच तो रटाळपणा आणि तीच ती साधणसामग्री यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जाधव यांना तसूभरही शैक्षणिक बदल घडवता आला नाही.

    यानंतर स्थायी समितीचे सभापती पद संतोष लोंढे यांना मिळाले. त्यांनी मागच्या वर्षी काय काम केले हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. कोविडचे कारण सांगून आण्णांचाही कारभार आसाच घाईघाईत निघून गेला. त्यांच्यानंतर नितीन लांडगे यांना स्थायीवर काम करण्याची संधी मिळाली. मात्र, ते केवळ सहीचे मानकरी होऊन बसले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत फसल्याने स्थायी समितीच्या दालनामध्ये नेमके काय चालते हे उजेडात आले. भोसरी गावठाणात स्थायी समितीची दोनवेळा संधी मिळून तरी भोसरीचा काय विकास झाला हे सर्वांनाच माहित आहे. जे मोठे प्रकल्प सुरू आहेत, ते राष्ट्रवादीच्याच काळातले आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मी हे केले किंवा ते केले, असे सांगितल्यावर नागरिकांचा विश्वास बसणार नाही. त्यांना बरेच काही करता आले असते. परंतू, सभापती पद केवळ नामधारी व्यक्तीकडे ठेवून कारभार भलत्याच कोणाकडे ठेवण्यात आला. त्यामुळे विद्यमान सभापतीच्या अडून भलताच व्यक्ती स्थायीची सुत्रे हलवू लागल्याने अडचणी वाढत गेल्या. त्यांच्या कुकर्मानेच नितीन लांडगे यांच्यासारखा साधा सरळ माणून कायद्याच्या कचाट्यात अडकला.

    आता आम्ही असे केलेच नाही, हे राजकीय षडयंत्र किंवा विरोधकांनी भाजपाच्या विरोधात जाणिपूर्वक केलेलं कांड असे म्हटलं जात आहे. परंतू, हे न समजण्याइतपत भोसरी तील जनता खुळी नाही. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षात जे काही मिळालं ते त्यांना मिळालं, आम्हाला काय मिळालं ? आम्हाला मिळवण्याची आलेली संधी सुध्दा त्यांनी हिरवून घेतली, अशा भावना व्यक्त करत नगरसेवक व कार्यकर्ते पक्षावर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. यामुळे आगामी काळात पक्षात फितुरी वाढल्यास ती रोखण्याचे कडवे आव्हान भाजप आणि महेश लांडगे यांच्या पुढे असणार आहे.