भाजपमध्ये गेल्यापासून ‘चांगली झोप’ लागते, ‘चौकशी वगैरे’ नाही – हर्षवर्धन पाटील

स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’,

    पुणे: पक्ष बदल करत भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून कायमच टीका केली जाते. भाजपमध्ये गेल्यावर ‘वाल्याचा वाल्मिकी होतो’ असेही अनेकदा म्हटलेले दिसून येते. आता माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना गमतीगमतीत एक वक्तव्य केलं. भाजपमध्ये आल्यापासून शांतपणे झोप लागते. कसली चौकशी नाही, असं पाटील म्हणाले. पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

    हर्षवर्धन पाटील हे आपलं खुमासदार भाषण आणि मिश्किल वक्तव्यांमुळं चांगलेच चर्चेत असतात. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.

    मावळमधील या कार्यक्रमाला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.