“साहेब, शेतीसाठी रात्रीची नको पण दिवसा वीज देता का ? ” ; शेतकऱ्यांची महावितरणकडे कळकळीची मागणी

पाटस : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठाचे वेळा पत्रक जाहीर करताच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीला दिवसा थ्री फेज वीज पुरवठ्यासाठी महावितरणाच्या साहेबांकडे , "शेतीसाठी रात्रीची नको पण दिवसा वीज द्या ", असे साकडे घातले आहे.

पाटस : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठाचे वेळा पत्रक जाहीर करताच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीला दिवसा थ्री फेज वीज पुरवठ्यासाठी महावितरणाच्या साहेबांकडे , “शेतीसाठी रात्रीची नको पण दिवसा वीज द्या “, असे साकडे घातले आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण विभागाने दर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्याचे वीज पुरवठा वेळा पत्रक जाहीर केले आहे, यामध्ये नोव्हेंबर महिन्यात शेतीसाठी एक आठवडा दिवस व एक आठवडा रात्री या वेळेत वीजपुरवठा केला जात होता, डिसेंबर महिन्याच्या नवीन वेळा पत्रका प्रमाणे शेतीसाठी एका आठवड्यात सकाळी ७:४५ ते दुपारी ३: ४५ वाजेपर्यंत व दुसऱ्या आठवड्यात रात्री ८:२५ ते पहाटे ६:२५ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा केला जाणार आहे, राज्य सरकार शेती आणि शेतकरी यांच्याबाबत घेतलेले काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना रात्रीचे काम करावे लागत आहे. रात्री होणाऱ्या थ्री फेज वीज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले आहे. रात्रीच्या वेळेस अशा गवतातून जाऊन कृषी पंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योग धंदयाच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते. दिवसाला सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध केली जात आहे, त्याच वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच अडचणीत वाढ म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकरी वर्ग वीजवितरण कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. वीजवितरण कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल अजब स्वरूपाचा बदल असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत, शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांना रात्रीच्या या बदलामुळे जागरण करावे लागत असून, यामुळे शेतकऱ्यांची झोपही आता पारखी झाली आहे. रात्री येणारी वीज शेतकरी वर्गासाठी तोट्याची आहे. दिवस उजाडण्याच्या आधीच वीज जाते यामुळे शेतात राहणाऱ्या महिलांना पाणी भरण्यासाठी रात्रीच जावे लागते.

“औद्योगिक वसाहतीला २४ तास वीज पुरवठा केला जातो, शेतीसाठी ८ ते १० तास वीज पुरवठा केला जातो तो पण रात्रीचा ! सरकार आणि वीज कंपनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे, कोरोना काळात सगळे ओदयोगिक कारखाने बंद होते पण ह्या वाईट काळात जगाचा पोशिंदा मात्र जगाला जगवण्यासाठी धडपड करत होता त्यामुळं शेतकऱ्याचं जगणं मान्य करावं ,बळीराज्याच्या संजीवनीसाठी सरकारने व महावितरणने दिवसा ५ तास व रात्री ५ तास वीज पुरवठा करावा.”
– संदीप घोले , शेतकरी

तालुक्यातील वीज पुरवठा वेळा पत्रक वरीष्ठ कार्यालयातुन मंजूर केले जाते, यावेळी विजेच्या मागणी, पुरवठा याचा विचार करून प्रत्येक तालुक्याचे वेळा पत्रक तयार केले जाते, यामुळे डिसेंबर महिन्यातील वीज पुरवठा वेळा पत्रकात बदल करता येणार नाही.

- वैभव पाटील, उप-कार्यकारी अभियंता, दौंड