उद्योगनगरीत घरफोडीच्या सहा घटना; पावणेअकरा लाखाचा ऐवज लांबवला

चोरटे कुलूप तोडून घरात घुसले. घरातून हेडफोन, इस्त्री, कॅमेरा, लेन्स, कॅमेऱ्याची बॅग, मेमरी कार्ड, चार्जर, बॅटरी व रोकड असा ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरी तसेच मोबाईल चोरण्याच्या घटनांपाठोपाठ घरफोडीचे प्रकारही शहरात सर्रास घडत आहेत. घरफोडीप्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये सहा गुन्हे दाखल करण्यात आले. या सहा घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तब्बल १० लाख ८० हजाराचा ऐवज लांबवला.

    अरिफा अन्वर तडवी (वय २६,रा.दत्तवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे घर १५ ऑगस्ट रोजी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास कुलूप लावून बंद होते. चोरटे कुलूप तोडून घरात घुसले. घरातून हेडफोन, इस्त्री, कॅमेरा, लेन्स, कॅमेऱ्याची बॅग, मेमरी कार्ड, चार्जर, बॅटरी व रोकड असा ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

    प्रदीप मल्हाराव ढोले (वय ४३, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ढोले यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरटे घरात घुसले. घरातून ५ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीचे २६१ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, चांदीची भांडी व रोकड रक्कम चोरून नेले. लवकुश घनशाम चव्हाण (वय २७, रा. एकतानगर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चव्हाण यांची लल्लू पान शॉप नावाची टपरी आहे. चोरट्यांनी टपरीचे कुलूप तोडून ३ हजार ९४१ रुपये किमतीची पाकिटे व रोकड चोरून नेली.

    रमेश बाळू बोराटे (वय ४४, रा. गंजी खान्याजवळ, बोराटे आळी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील आठ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. साहिल संजय धुमाळ (वय १८, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. धुमाळ यांचे किवळे येथे एसडी कलेक्शन मेन्स वेअर नावाचे कपड्याचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाच्या शटरची कडी तोडून दुकानातील १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. रवींद्र डिगंबर पाटील (वय ४८, रा. दत्तनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ७० ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड चोरून नेली.