तिसऱ्या टप्प्यात ड्रग्स बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंघोषित डॉक्टरसह सहा जणांना अटक ; चाकण एमडी ड्रग्ज प्रकरणाचे गुजरात कनेक्शन

-पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : दोन महिन्यापूर्वी चाकण येथे २० कोटी रुपयांचे २० किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडल्यानंतर सुरु असलेल्या तपासात नवीन-नवीन धक्कादायक खुलासा होत आहे. आता या प्रकरणाचा गुजरात कनेक्शन समोर आले आहे. तपासाचा तिसऱ्या टप्प्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी ड्रग्स बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंघोषित डॉक्टरसह सहा जणांना गुजरात आणि मुंबईमधून अटक केली आहे. यात फॅक्टरी जागा, केमिकल उपलब्ध करून देणारा, विक्री करणारा यांचा समावेश आहे.

आतापर्यंत पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. सुरुवातीला चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजीवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार तुषार सुर्यकांत काळे (रा. बोरीवली) आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई) आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको या तिघांना अटक केली.

आता या प्रकरणाच्या तपासाच्या तिसऱ्या टप्प्यात पोलिसांनी परशुराम भालचंद्र जोगल (वय ४४, रा. ठाणे), मंदार बळीराम भोसले (वय ४९, ठाणे), राम मनोहरलाल गुरबानी (वय ४३, रा. वेस्ट मुंबई), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (वय ३९, रा. ओशिवरा मुंबई. मुळगाव जटनगला पो स्टे बडकेली जि मुझफरनगर उत्तरप्रदेश), मनोज एकनाथ पालांडे (वय ४०, रा. गणेशनगर वरसे ता रोहा जि रायगड), अफजल हुसैन अब्बास सुणसरा (वय ५२, रा. जोगेश्वरी वेस्ट मुंबई. मुळगाव मेहता ता बडगाम जि बनासकाठा उत्तर गुजरात) यांना अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले होते. आरोपींनी रांजणगाव येथील एका कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे १० ते १५ किलो एमडी ड्रग्ज तयार केल्याची माहिती सामोर आली आहे. या ड्रग्ज प्रकरणात एका नायजेरियन व्यक्तीचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहेत. झुबी इफनेयी उडोको असे या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. झुबी एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे. त्याने त्याच्या विजा मध्ये देखील छेडछाड केली आहे. त्याबाबत त्याच्यावर स्वतंत्रपणे कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला मुंबई येथून अटक केली.

-रांजणगाव एमआयडीसीमध्ये बनवले ड्रग्ज

सुरुवातीला अटक केलेला आरोपी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये तुषार सुर्यकांत काळे, किरण राजगुरू, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीत सुमारे १३२ किलो एम डी ड्रग्ज बनवले होते. त्यातील ११२ किलो एम डी ड्रग्ज हे तुषार काळे याने यापूर्वीच नेऊन त्याची बाजारात विक्री केली होती. राहिलेले २० किलो ड्रग्ज हे अक्षय काळे याने त्याच्या घरी ठेवले होते. त्याची विक्री करण्यासाठी जात असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर सापळा लाऊन त्यांना अटक केली होती. किरण काळे हा रांजणगाव एमआयडीसी मधील एका दुस-या कंपनीत संचालक म्हणून काम करत आहे. त्याने यासाठी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी, किरण राजगुरू व तुषार काळे यांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी उपलब्ध करून दिली होती.

-छोटा राजन गॅंगशी संबंध

यासाठी किरण काळे याने त्याच्या कार्यालयात आरोपींसोबत मिटिंग घेऊन एक किलो ड्रग्ज बनवण्यासाठी ६० हजार रुपये असा दर ठरवला होता. तुषार काळे याने त्या बदल्यात एकूण ६७ लाख रुपये दिले होते. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याने पोलिसांनी सर्व आरोपींची बँक खाती फ्रीज केली आहेत. रांजणगाव एमआयडीसीमध्ये बनवलेल्या १३२ किलो इमडी ड्रग्ज पैकी ११२ किलो ड्रग्ज तुषार सुर्यकांत काळे याने नायगाव वसई येथे राहणा-या जुबी उकोडो नावाच्या नायजेरियन व्यक्तीला विकले होते. तुषार काळे याला राकेश खानिवडेकर याने ड्रग्ज बनवणे, विकणे आणि पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली आहे. राकेश हा एमडी ड्रग्ज रॅकेट मधील प्रमुख सूत्रधार असून त्याला यापूर्वी डी आर आय च्या अधिका-यांनी पालघर येथील एका कंपनीत अमली पदार्थ बनवण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपी तुषार सुर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे.

-८५ लाखाची रोकड़, ७५ लाखाची २ एकर जागा जप्त

तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर यांच्याकडून ड्रग्ज विक्रीतून आलेले ८५ लाख रुपये रक्कम जप्त केली आहे. तुषार काळे याने पालसाई, ता. वाडा, जि. पालघर येथे ७५ लाख रुपये किमतीची दोन एकर जागा विकत घेतल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. ती शेतजमीन ड्रग्ज विक्रीच्या पैशांतून घेतली असल्याने ती मालमत्ता देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. तुषार काळे त्या जमिनीवर स्वतःची एक कंपनी सुरु करणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तुषार आणि राकेश यांनी आणखी तीन ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवले आहेत. त्याबाबत देखील पोलिसांचा तपास सुरु आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २० कोटी ९० लाख २३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

-साथीदार पकडल्यानंतर गुजरात येथे बस्तान हलवले

पिंपरी चिंचवड शहरात ड्रग्ज पकडल्यानंतर आरोपींनी गुजरात येथे बस्तान हलवले होते. तिथे ते कंपनी सुरू करून ड्रग्ज बनवणार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख, पोलीस सब इन्स्पेक्टर गिरीष चामले व पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनिल कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदिप पाटिल, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्ठे यांच्या पथकाने केली आहे.