धक्कादायक! ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलेकडून सोळा हजाराची मागणी ; रुग्णाबरोबर आलेल्या महिलेचा डॉक्टरांकडून विनयभंग

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसूतीसाठी आलेली शिला पवार ही महिला ऊसतोडणी मजूर आहे. प्रसूतीसाठी खाजगी डॉक्टर बोलवायला लागतील असे सांगून सोळा हजार रुपयांची मागणी केली. यावेळी त्या महिलेने एवढे पैसे देण्याची ऐपत नसल्याचे सांगितल्याने दहा हजार रुपये मागितले व आठ हजार रुपये रोख घेतले. या महिलेची नॉर्मल प्रसुती झाली.

    जेजुरी : येथील ग्रामीण रुग्णालयात पाच दिवसापूर्वी रात्री अकरा वाजता प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे तेथील डॉक्टरांनी सोळा हजार रुपयांची मागणी केली. तर तिच्याबरोबर आलेल्या महिलेचा दुसरे दिवशी विनयभंग केला अशी फिर्याद पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.

    जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसूतीसाठी आलेली शिला पवार ही महिला ऊसतोडणी मजूर आहे. प्रसूतीसाठी खाजगी डॉक्टर बोलवायला लागतील असे सांगून सोळा हजार रुपयांची मागणी केली. यावेळी त्या महिलेने एवढे पैसे देण्याची ऐपत नसल्याचे सांगितल्याने दहा हजार रुपये मागितले व आठ हजार रुपये रोख घेतले. या महिलेची नॉर्मल प्रसुती झाली. दुसरे दिवशी या महिलेच्या पतीकडे राहिलेल्या दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे न दिल्याने पत्नीला व बाळाला भेटून दिले नाही. रात्री तिच्याबरोबर सोबतीसाठी राहिलेल्या फिर्यादी महिलेकडे डॉक्टरांनी वाईट भावनेने पाहून त्यांना लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. हात धरून ओढले व विनयभंग केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व हवालदार लोंढे अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी जेजुरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्रफुल काकडे यांच्यावर भारतीय दंड विधान ४२० व ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.