…तर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले ; महादेव जानकर यांचा भाजपला सूचक इशारा

बारामती ,माढा किंवा परभणीतून लोकसभा लढणार

    बारामती : मी भाजपबरोबर सध्या असलो तरी पण, भविष्यात जर काही गोष्टी वेगळ्या घडल्या, तर सगळेच पर्याय आमच्यासमोर खुले आहेत,असा सूचक इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.आगामी लोकसभा निवडणुक परभणी, माढा किंवा बारामतीतून लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बारामतीत रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांच्या कार्यालयात पत्रकारांशी आ. जानकर यां संवाद साधला.

    यावेळी जानकर म्हणाले, राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणुकीत लक्ष केंद्रीत करणार असून किमान २० आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने संघटना बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. परभणी, जालना, हिंगोली, माढा, बारामती यासह पाच मतदारसंघावर मी लक्ष केंद्रीत करणार आहे. या मतदारसंघातील किमान वीस विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची आमदारांची संख्या वाढली, तर राज्याच्या सत्ताकारणात आमच्याशिवाय सरकारच बनणार नाही, अशी स्थिती निर्माण होईल. मी सध्या आमदार असलो तरी २०२४ च्या निवडणुकीत मी परभणी, माढा किंवा बारामती यापैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही माजी मंत्री जानकर यांनी स्पष्ट केले.

    धनगर समाज बांधवाना आदिवासीच्या २२ योजनांच्या सवलती मिळाव्यात, यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अध्यादेश काढण्यात आला होता. त्या योजनांसाठी एक हजार कोटींची तरतूदही केली होती. मात्र, त्या वेळी आचारसंहिता लागली व सरकार गेले. दुर्देवाने महाविकास आघाडीच्या सरकारनेही तरतूद केलेली नव्हती. मात्र, मी सभागृहात मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंभर कोटींची तरतूद यासाठी केली. महाविकास आघाडीवर यावेळी टीका करणार नाही, असे सूचक वक्तव्य जानकर यांनी यावेळी केले. मी भाजपसोबत असलो राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्यासह सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत माझे मैत्रीचे संबंध असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.यावेळी ज्ञानेश्वर सलगर, माणिकराव दांगडे -पाटील, संदिप चोपडे, अमोल सातकर, किरण गोफणे आदी उपस्थित होते