…तर पंधरा दिवस क्वांरटाईन ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

-पर्यटनस्थळे, बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी

    पुणे : निर्बंध शिथील केल्यानंतर नागरीकांकडून याेग्य ती काळजी घेतली जात नाही. यामुळे शनिवार आणि रविवार असे दाेन दिवस लाॅकडाऊन कायम ठेवण्याचा तसेच पुण्याबाहेर जाऊन परत पुण्यात येणाऱ्यांना पंधरा दिवस क्वांरटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    शनिवारी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी काेराेनाची आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बाेलताना त्यांनी ही माहीती दिली. निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरीकांकडून पर्यटनस्थळे तसेच बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे नमूद करीत पवार यांनी नागरीक असे वागत आहे अशा शब्दात चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ पर्यटनाच्या निमित्ताने अनेक नागरीक राज्याबाहेर जात आहे. ते परत पुण्यात आल्यानंतर त्यांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल. तसे आदेश काढण्याची वेळ येऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केले.

    पवार म्हणाले,‘‘ पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, खोपोली अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या रांगा लागत आहेत. नागरिक असे का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. देवदर्शनासाठी जात असतील तर आम्ही अडवणार नाही, हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. पण काही जण ट्रेकिंगला वैगेरे जात आहेत. तसं जर झालं तर पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यानतंर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावे लागेल. तसे आदेश काढावे लागतील.’’

    शनिवार, रविवार दुकानं बंद राहणार
    “करोना संकट हळूहळू कमी होत असलं तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील असा निर्णय घेतला असून सोमवार ते शुक्रवारच दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण महाराष्ट्रात करोना कमी होऊ लागला असला तरी रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप प्रमाण जास्त आहे.

    “टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अमेरिका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही ठिकाणी तिसरी लाट येऊ पाहत असल्याचं सांगितलं आहे. खासकरुन अमेरिका आणि इंग्लंड येथे मोठ्या प्रमाणात लसीसकरण होऊनही अशी परिस्थिती झाली आहे. नीट काळजी घेतली नाही आणि जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडते. ही गोष्ट होता कामा नये,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    ५३ टक्के मृत्यू ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे
    “पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यूंचं विश्लेषण करण्यासाठी चार रुग्णालयं निवडण्यात आली होती. तिथे ५३ टक्के मृत्यू ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे आहेत. २५ ते ६० या वयोगटात ५३ टक्के मृत्यू आहे. अनेक तरुण-तरुणींना आपल्याला काय होणार असं वाटत आहे. पहिल्या लाटेत ६० च्या वरील वयस्कर लोकांना संसर्ग होत होता. पण आता जो रिपोर्ट आला आहे त्याचा बारकाईने अभ्यास केला असता ही माहिती समोर आली. ४३ टक्के मृत्यू कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींचे आहेत, तसेच २० टक्के मृत्यू ३१ ते ४५ वयोगताटील आहेत .

    शिवसेनेसोबत की स्वबळावर?
    अजित पवार यांनी यावेळी शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा स्वबळावर लढायचे की, कोणासोबत जायचे ते मी सांगेन असं सूचक विधान केलं आहे.