…तर घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता ; केंद्रीय सहकार मंत्रालयाचा निर्णय स्वागतार्ह

'सहकार' हा विषय घटनेमध्ये राज्यसूचीमध्ये येत असल्याने त्यासंबंधी कायदा करण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारांनाच आहे. आंतरराज्यीय (multi-state) सहकारी संस्था या केंद्रीय लिस्ट' मध्ये क्र. ४४ वर येत असल्याने त्यासंबंधी कायदा करण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे.

    पुणे : स्वतंत्र केंद्रीय सहकार मंत्रालयाचा निर्णय स्वागतार्ह असला तरी घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता दि महाराष्ट्र अर्बन काे – अाॅप. बॅंक्स फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली आहे.केंद्र सरकारने काल सहकारक्षेत्राकरिता स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली. या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात या मंत्रालयाचे बोधवाक्य ‘सहकार से समृद्धी असे दिले आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर प्रथमच केंद्र सरकारने सहकार चळवळीच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलल्याचे दिसून येते. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले पाहीजे अशी प्रतिक्रीया अनास्कर यांनी व्यक्त केली.

    ‘‘ सहकार क्षेत्राचे भले होत असेल तर ते केंद्र सरकारने केले का राज्य सरकारने हा मुद्दा गौण ठरतो. या संदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात देशातील सहकार क्षेत्राला स्वतंत्रपणे प्रशासकीय कायदेशीर व धोरणात्मक चौकट व त्या माध्यमातून चळवळीचे सक्षमीकरण असा उद्देश विशद केला आहे. ही अत्यंत सकारात्मक व चांगली बाब असली तरी या उद्देशाची अंमलबजावणी करताना घटनात्मक अडचणी येण्याची शक्यता आहे. याच मुद्दयावर ९७ वी घटना दुरुस्ती देखील गुजराथ उच्च न्यायालयाने फेटाळली होती. ही बाब विसरून चालणार नाही.’’ असे अनास्कर यांनी सांगितले.

    ‘सहकार’ हा विषय घटनेमध्ये राज्यसूचीमध्ये येत असल्याने त्यासंबंधी कायदा करण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारांनाच आहे. आंतरराज्यीय (multi-state) सहकारी संस्था या केंद्रीय लिस्ट’ मध्ये क्र. ४४ वर येत असल्याने त्यासंबंधी कायदा करण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. अशावेळी नियोजित मंत्रालय हे केवळ मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी करताच काम करणार का? आणि जर त्यांनी देशातील सर्व सहकारी संस्थांकरिता काम करावयाचे ठरवले तर संघराज्यीय पद्धतीमध्ये राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केल्याचा आरोप होऊ शकताे याकडे अनास्कर यांनी लक्ष वेधले आहे.