…तर तुम्ही ही होऊ शकता पालिका आयुक्त! ; पिंपरी-चिंचवड पालिकेची तरुणींना संधी

पिंपरी-चिंचवडने दीर्घकालीन विकासाचे धोरण अवलंबले आहे, त्याअंतर्गत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी १३ विषयांवरील ९१ प्रश्नांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. सुमारे १५ हजार नागरिकांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला.या सर्वेक्षणातून शहराला आकार देणारे तीन महत्त्वाचे घटक पुढे आले

  पिंपरी : शहरी प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने वी युवा चॅलेंज सुरू केले आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील सर्व महिलांसाठी हे चॅलेंज खुले असणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला २०३० पर्यंत भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी व विकासाच्या कोणत्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे याविषयी व्यक्त होण्याचे व्यासपीठ या निमित्ताने महिलांना उपलब्ध होणार आहे. या चॅलेंजच्या विजेत्या महिलेला पिंपरी चिंचवड महापालिकेचे एक दिवसासाठी आयुक्त होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
  पिंपरी-चिंचवडने दीर्घकालीन विकासाचे धोरण अवलंबले आहे, त्याअंतर्गत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी १३ विषयांवरील ९१ प्रश्नांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. सुमारे १५ हजार नागरिकांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला.या सर्वेक्षणातून शहराला आकार देणारे तीन महत्त्वाचे घटक पुढे आले. सिटी ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन घटकांवर पिंपरी चिंचवड महापालिका सहभागी महिलांकडून त्यांच्या संकल्पना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये ६०० शब्द जास्तीत जास्त अथवा २ मिनिटांचा व्हिडीओ अशा स्वरुपात मागवित आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी याबबतची माहिती nagarvasti@pcmcindia.gov.in २२ मार्च पर्यंत पाठवायची आहे

  महिला सर्व क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करत आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी करतात. महिला सक्षमीकरण हे सर्व स्त्रोत, लोक, क्षेत्र आणि दृष्टीकोनातून येते. आंतरराष्ट्रीय महिला दिन, महिला सक्षमीकरणाच्या सामूहिक प्रयत्नांनी समर्थित आहे. आम्ही आशावादी आहोत की वी युवा चॅलेंजमुळे महिलांना प्रशासनात सहभागी होण्याचा वेगळा अनुभव मिळेल.
  माई ढोरे, महापौर

  वी युवा ही एक नवीन संकल्पना आहे जी तरुण महिलांचे नेतृत्वाचे स्वप्न साकार करेल. पिंपरी चिंचवड महापालिकेचा असा विश्वास आहे की शहरी प्रशासनामध्ये महिलांचा सकारात्मक सहभाग वाढविणे हे अधिक महत्वाचे आहे. शहरी स्थानिक संस्था चालवण्यापासून ते देश चालविण्यापर्यंत जगाला महिला नेत्यांची आवश्‍यकता आहे. याच बाबीचा विचार करून आम्ही १८ ते २५ वर्ष वयोगटातील महिलांकडून २०३० पर्यंत पिंपरी-चिंचवडला भारतातील राहण्यासाठी सर्वात योग्य शहर बनवण्याच्या दृष्टीने संकल्पना मागवित आहोत.
  -राजेश पाटील, आयुक्त