काही नाराज पण कोणीच जाणार नाही ; पुण्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा

पुणे : नगरसेवकांमध्ये नाराजी आहे, पण काेणीच पक्ष साेडून जाणार नाही असा दावा भाजपचे स्थानिक नेत्यांनी केला आहे. भाजपचे महापालिकेतील १९ नगरसेवक महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, ही अफवा पसरविली गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुणे : नगरसेवकांमध्ये नाराजी आहे, पण काेणीच पक्ष साेडून जाणार नाही असा दावा भाजपचे स्थानिक नेत्यांनी केला आहे. भाजपचे महापालिकेतील १९ नगरसेवक महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, ही अफवा पसरविली गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाजपमधील नाराज नगरसेवक हे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यांच्यावर शहर भाजपकडून लक्ष ठेवण्यात येत आहे, अशा प्रकारचे वृत्त प्रसारीत झाल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीष बापट, माजी खासदार संजय काकडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बाेलून खुलासा केला आहे. काेणीही पक्ष साेडून जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. त्याचवेळी पक्षातील काही नगरसेवक नाराज असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

महापालिकेत भाजपचे संख्याबळ ९८ असून, यामध्ये माजी खासदार काकडे यांच्या समर्थक नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. भाजपने महत्वाची पदे देताना पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली. तुलनेत नवीन आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना अपेक्षित संधी मिळाली नसल्याचा दावा केला जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महापालिकेतील भाजपमधील काही नगरसेवकांच्या नाराजीविषयीची चर्चा प्रसारमाध्यमात सुरू झाली. त्यानंतर पक्षाने काही जणांना दुय्यम स्वरुपाची पदे देऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला हाेता.

भाजपचे शहराध्यक्ष मुळीक, खासदार बापट आणि माजी खासदार काकडे यांनी महापािलकेतील भाजपमधील १९ नगरसेवक आगामी महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, त्या अफवा असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाची महापािलकेतील सदस्य संख्या ही जास्त आहे, प्रत्येकाला पदाची संधी देता येत नाही. त्यामुळे काही नाराज असू शकतात. पक्षात काेणताही गट – तट नाही. काेणीतरी मुद्दाम अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहे, त्याने काही हाेणार नाही असा दावा या तीनही नेत्यांनी केला आहे.