सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्य या पिकांना धोका!

तळेगाव दाभाडे :  मावळ तालुक्यात मान्सूनचा गेली दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असून पावसाचे प्रमाण असे चालू राहिल्यास मावळच्या पूर्व भागातील सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्य या पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे.

गेली दोन-तीन दिवस मावळ तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने खरीप भात पिकाची भात खाचरे ओसंडून भरून वाहत आहे. तर सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग आणि उडीद या पिकांची शेतात पाणी साचल्याने पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.पूर्व पट्यात इंदोरी, सुदूंबरे, सुदवडी, माळवाडी, शेलारवाडी, सोमाटणे,शिरगाव, गोडुंब्रे, साळुंब्रे,गहुंजे, सांगावडे, दारुंबे चांदखेड,धामणे,परंदवडी,ऊर्षे या गावांच्या परिसरातील खरीप सोयाबीन, भुईमूग,कडधान्य या पिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे. मात्र भात पिके जोमात,चांगली आलेली आहेत.सप्टेंबरमध्ये २२ तारखेच्या अगोदर काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतक-यांना शेतातील मशागतीची कामे करण्यास संधी मिळेल यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पुन्हा या पावसाने संततधार लावल्याने शेतक-यांचा हिरमोड झाला आहे.

जोरदार पावसाने तालुक्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून धरणातून जादा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी, आंध्रा, यांना मोठे पूर आलेले आहेत. तर नदीकाठच्या लोकांना शासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.जोरदार पावसाने मावळ्याच्या डोंगरी भागात गवती रानातील गवताची चांगली वाढ होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निकालात निघत आहे.