शहर पोलीस दलातील बदल्यांसाठी खास संगणकीय प्रणाली ; संगणकीय प्रणालीमुळे बदली प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक

‘जीटीपीएमएस’ प्रणालीद्वारे नियमित वार्षिक बदल्यांसाठी पात्र असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती शहरातील विविध पोलीस परिमंडळांकडून संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांनी यापूर्वी कोणत्या पोलीस ठाण्यात काम केले आहे, याची माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या पाच पर्यायांपैकी एका ठिकाणी बदली करण्यात येणार आहे.

  पुणे : पोलीस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर बदलीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रशासनास लेखी अर्ज करावे लागत होते. वरिष्ठांकडून बदली अर्जावर निर्णय झाल्यानंतर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. बदलीसाठी अर्ज करणाऱ्या पोलिसांचा वेळ जात होता. शहर पोलीस दलातील बदल्यांसाठी आता सर्वसाधारण बदली व्यवस्थापन प्रणाली (जीटीपीएमएस) तयार करण्यात आली आहे. संगणकीय प्रणालीमुळे पोलिसांची बदली प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक होणार आहे.

  पोलीस दलात कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेतून बदली करण्यात येते. काही पोलिसांची बदली विनंती अर्जावरून केली जाते. बदल्यांची प्रक्रिया अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून व्हाव्यात.यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याची सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीचे सहकार्य घेऊन संगणकीय प्रणाली विकसित केली.

  ‘जीटीपीएमएस’ प्रणालीद्वारे नियमित वार्षिक बदल्यांसाठी पात्र असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती शहरातील विविध पोलीस परिमंडळांकडून संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांनी यापूर्वी कोणत्या पोलीस ठाण्यात काम केले आहे, याची माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या पाच पर्यायांपैकी एका ठिकाणी बदली करण्यात येणार आहे. विनंती बदली अर्जात कारणांची पडताळणी करण्यात येणार आहे.

  यावर्षी कार्यकाळ पूर्ण केलेल्या १३०० पोलिसांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. साडेसातशे पोलिसांनी बदलीसाठी विनंती अर्ज दिले आहेत. बदल्यांची प्रक्रिया संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात येणार आहे. पदनिहाय आणि कामाच्या पद्धतीनुसार बदल्यांची नोंद केली जाणार आहे.

  पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘जीटीपीएमएस’ संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या, कुशल मनुष्यबळ विचारात घेऊन बदली करण्यात येणार आहे. संगणकीय प्रणालीमुळे पोलिसांची बदली प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक होईल.

  – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे