पाटसच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची विशेष सोय

दौंड : दौंड तालुक्यातील पाटसमधील कोविड केअर सेंटरमध्ये शासकीय मदती व्यतिरिक्त पाटसकरांनी लोकवर्गणीतून रुग्णांच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी दररोज विशेष काळजी घेतली असल्याने अनेक कोरोना मुक्त रुग्णांनी पाटसकारांचे आभार व्यक्त केले आहेत. पाटस येथील नागेश्वर विद्यालयात पाटसकरांच्या पुढाकाराने शासनमान्य कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. यावेळी पन्नास बेड सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आल्या. यावेळी प्रशासनाकडून सर्व रुग्णांना दुपारी व संध्याकाळी जेवण दिले जाते. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांची पाटसकरांनी विशेष काळजी घेतल्याने कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांनी घरी जाताना पाटसकरांचे मनापासून आभार मानले. या जागतिक महामारीतून सावरण्यासाठी पैसा, पद, अधिकार काहीच उपयोगाचा नसून फक्त आपलेपणाची भावनाच कोरोनाच्या संकटावर रामबाण उपाय आहे,अशी खात्री अनेकांनी व्यक्त केली आहे. यावेळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण पाटस कोविड केअर सेंटरमध्ये कुटुंबासह दाखल झाले तेव्हा त्यांच्यात पहिल्याच दिवशी खूप दडपण व भीती निर्माण झाली होती. पण डॉ. बडे यांनी पहिल्याच भेटीत सर्वांना आपुलकीचा हात देत कोविड सेंटर नसून हे तुमचे घर आहे याची जाणीव करून दिली. तसेच रात्री बेरात्री अडचण आल्यावर कधीही फोन करा असा विश्वास बडे यांनी सर्व रुग्णांना दिला.