मध्यप्रदेशातील परप्रांतीय मजुरांसाठी धावली विशेष रेल्वे

पाटस : लाॅकडाऊन काळात दौंड तालुक्यात अडकवून पडलेल्या सुमारे ११७२ मजुरांना मध्यप्रदेश राज्यात पाठवण्यात आले आहे.

 पाटस : लाॅकडाऊन काळात दौंड तालुक्यात अडकवून पडलेल्या सुमारे ११७२ मजुरांना मध्यप्रदेश राज्यात पाठवण्यात आले आहे. दौंड रेल्वे जंक्शन वरून दौंड ते ग्वालियर या एका विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेत बसण्यापूर्वी परप्रांतीय मजुरांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. रेल्वे स्टेशन वर दौंड प्रशासनाचे अधिकारी, रेल्वे अधिकारी यांनी टाळ्या वाजवून रेल्वे जाण्यास ग्रीन सिग्नल दिला शिवाय संध्याकाळच्या जेवण्याची व पाण्याची व्यवस्था केली होती. ही विशेष रेल्वे २२ डब्यांची होती तर या यामध्ये ११७२ परप्रांतीय मजूर होते. त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी सकाळ पासून महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी मध्य प्रदेशातील जिल्ह्यानुसार परप्रांतीयांची विभागणी करून रेल्वेच्या डब्यात बसविण्यात आले होते. तर नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या सूचना देण्यात येत होत्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांमुळे इतक्या मोठया संख्येने परप्रांतीय असताना देखील त्यांना सुखरूप आपल्या मूळगावी पाठविण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली होती. यावेळी दौंडचे प्रांतअधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील यांनी झेंडा दाखवून ही विशेष रेल्वे सोडण्यात आली. रेल्वे गाडी सुटल्यानंतर परप्रांतीयांनी भारत माता की जय आशा घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.