‘एसटी ही महाराष्ट्राची ओळख , त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही- अनिल परब

एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही, असे सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने एसटीला ६०० कोटींचा निधी दिला आहे.

    पिंपरी: कोरोनाच्या महामारीमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, काही बसगाड्यांच्या फेNयांचे एकत्रीकरण करणे, अशा काही उपाययोजना आखून एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

    वाकडेवाडी येथील एसटी स्थानक आणि दापोडी येथील एसटी कार्यशाळेला भेट दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भोसरी येथील सेन्ट्रल इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च अँड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी ) येथे भेट दिली. या ठिकाणी परब यांनी एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत एसटीच्या उत्पन्न वाढीसंदर्भातील विविध पर्यायांवर चर्चा केली.
    अनिल परब म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ तर एसटीचे उत्पन्न एकदम शून्यावर आले होते. अजूनही एसटीची सेवा पूर्णपणे चालू होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. या काळात एसटीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढ कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. एसटीचा खर्च कमी करण्यासाठी एसटीच्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही फेऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे, असे परब यांनी सांगितले.

    एसटीचे खासगीकरण नाहीच

    एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही, असे सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने एसटीला ६०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे वेतनासारख्या अत्यावश्यक गोष्टीना आता अडचण येणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.

    दापोडी येथील कार्यशाळेची पाहणी

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेची पहाणी केली. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. बसनिर्मिती प्रक्रिया, त्यासाठी लागणारा कालावधी, उपलब्ध सोई – सुविधा, कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या कार्यप्रणाली संबंधी माहिती घेतली.