स्थायी समितीत ९१.७८ कोटी च्या खर्चास मान्यता; स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन:आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. या बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनर्स्थापना खर्च शासनाकडे भरावा लागणार आहे. या खर्चाचा पहिला हप्ता ३५ कोटी ५५ लाख पुणे पाटबंधारे विभागास यांना अदा केला जाणार आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हिश्श्याचे सुमारे २७ कोटी रुपये पुणे महानगर परिवहन मंडळाला अदा करण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली. यासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ९१ कोटी ७८ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.  महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

    पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन:आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. या बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनर्स्थापना खर्च शासनाकडे भरावा लागणार आहे. या खर्चाचा पहिला हप्ता ३५ कोटी ५५ लाख पुणे पाटबंधारे विभागास यांना अदा केला जाणार आहे. तर आंद्रा धरणातून ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा पुनर्स्थापना खर्चाचा तिसरा हप्ता २० कोटी १६ लाख पुणे पाटबंधारे विभागास अदा केला जाणार आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी येथील ताब्यात येणा-या गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधण्याच्या कामामध्ये विद्युत विषयक कामे करण्यासाठी आणि जाधववाडी येथील नवीन शाळेचे विद्युतीकरण करण्यासाठी ५२ लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चासदेखील स्थायी समितीने मान्यता दिली.